मुंबई : सध्या राज्यभरात पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये सर्वांत जास्त डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे हाल झाले. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे. अशातच भांडुप पश्चिम येथील कांबळे कंपाऊंडमधील लक्ष्मीबाई आकाराम कांबळे चाळीची संरक्षक भिंत कोसळली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रशासनाच्या वारंवार दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या भिंतीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे अर्ज केले होते, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून ही संरक्षक भिंत जीर्ण झाली होती आणि कधीही कोसळण्याची भीती होती.
रहिवाशांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली होती, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे.घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून नागरिकांना धीर दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश महासचिव विश्वास सरदार, वंचित बहुजन महिला आघाडीच्या माजी तालुका महासचिव रंजना कांबळे, तसेच राहुल बनसोडे, राहुल जाधव, रोहित कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.