अकोला : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.
“महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कमिशन कमी होऊ नये, म्हणूनच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.” अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ते म्हणाले की, “ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना खावटी मिळेल आणि सर्वेक्षण झाल्यानंतर संपूर्ण मोबदला देखील मिळतो. मात्र सरकार जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे. पाऊस ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, त्यामुळे आत्ताच तो जाहीर करणे आवश्यक आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ का जाहीर केला नाही? याचा खुलासा त्यांनी करावा.”
याचबरोबर मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितले, “जात, धर्म पाहून मतदान करू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना आता मतदारांनीच धडा शिकवला पाहिजे.”