अकोला : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात एक मोठी खळबळ उडाली आहे. अकोल्यात महापौर बसवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला (भाजप) पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली आहे. या मुद्द्यावरून आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तसेच अकोला येथे शरद पवार यांनी थेट भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो, असे सांगणाऱ्या शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्यक्षात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालत नाही; तर केवळ नागरिकांना गुमराह करण्यासाठी त्यांच्या नावांचा वापर केला जातो. अशा प्रतिक्रिया सध्या जनतेतून उमटत आहेत. (Vanchit bahujan aghadi)
वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणावरून राज्यातील पुरोगामी विचारवंत, पत्रकार आणि विश्लेषकांना थेट आवाहन केले आहे. त्यांनी या व्यक्तींच्या प्रतिक्रियेची मागणी केली आहे. निवडणुकीच्या काळात ह्या सर्व पत्रकार, विचारवंतांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रचार केला होता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मतं मागितली होती.
वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावर ट्विट करता काही नावांचा उल्लेख करत त्यांना या राजकीय घडामोडीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. (Vanchit bahujan aghadi)
निखिल वागळे (ज्येष्ठ पत्रकार), असीम सरोदे (ज्येष्ठ विधिज्ञ), विश्वंभर चौधरी आणि संजय आवटे, किरण माने (अभिनेते), दीपक पवार आणि संग्राम पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विचारण्यात आले आहे की, “जे लोक नेहमी भाजपच्या विरोधात आणि संविधान वाचवण्याच्या गप्पा मारतात, ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर गप्प का आहेत? या सर्वांनी आता आपली प्रतिक्रिया द्यावी.” असे वंचित बहुजन आघाडीने सवाल केला आहे.
अकोल्यातील या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंचितने याला ‘महामंडळाचे लोक’ असे संबोधित केले आहे.





