– एस. एस. मोरे
आज 30 मे 2026 — सुमारे 9 दशके, म्हणजेच 90 वर्षांपूर्वी, याच दिवशी, दिनांक 30 मे 1936 रोजी दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे ‘अखिल मुंबई इलाका महार परिषद’ भरली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्या वचनपूर्तीसाठी काय करायचं? त्याचे नियोजन कसे राहणार? कोणकोण सोबत असणार? आणि त्याची रूपरेषा कशी राहणार? हे ठरवण्यासाठी अस्पृश्यांची संयुक्त सभा आयोजित केली. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, स्पृश्य हिंदू कधीच अस्पृश्यांना माणूस म्हणून वागवणार नाहीत किंवा स्पृश्य हिंदूंच्या मनातील अस्पृश्यांबाबतचा द्वेष कधीच कमी होणार नाही. “हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू, असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू, असेच म्हणण्यासारखे आहे.” म्हणून आपल्याला धर्मांतराशिवाय दुसरा उपाय नाही, हे पटवून देण्यासाठी केलेले भाषण म्हणजेच ‘मुक्ती कोण पथे?’ किंवा मुक्तीचा मार्ग कोणता? या नावाने प्रकाशित व प्रसिद्ध आहे.
त्यामध्ये अस्पृश्यांना त्यांच्यावर होत असलेले अन्याय, अत्याचार व त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य याची जाणीव करून देताना बाबासाहेब म्हणतात की, तुम्ही हिंदू असूनही हिंदू तुमच्यावर अत्याचार का करतात? दुसरीकडे तुमची संख्या जेवढी आहे, तेवढीच मुस्लिमांची आहे; पण त्यांच्यावर हे स्पृश्य हिंदू तेवढा अत्याचार करीत नाहीत. कारण त्यांना हे माहिती आहे की, गावात मुस्लिमांची दोन घरे जरी असतील, तरीसुद्धा त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती मिळताच पंजाबपासून तर मद्रासपर्यंतचे संपूर्ण मुस्लिम सामर्थ्याने एकत्र येतील आणि अन्याय करणाऱ्याला धडा शिकवतील. तुमच्या बाबतीत मात्र असे काही नाही. बाबासाहेब पुढे म्हणतात, तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही, असे नाही; मात्र तुम्ही हिंदू असूनही तुमच्यावर होत असलेले अन्याय-अत्याचार हिंदूंच्या गावात-दारी, हिंदूंच्या समोर होत असतानासुद्धा ते बघ्याची भूमिका घेतात, कारण तुम्ही हिंदू नाहीतच, याची ते प्रचिती देतात, असेच प्रतीत होते. त्यामुळे तुमच्या मागे आज कोणीही सामर्थ्याने उभे नाहीत. म्हणून तुम्ही आपले सामर्थ्य निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म आत्मसात करावा लागेल, जेणेकरून जगातील इतर बौद्ध राष्ट्र तुमच्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांविरुद्ध मुस्लिम-ख्रिश्चनांप्रमाणे एकजुटीने लढतील.”
बाबासाहेब पुढे सांगतात की, धर्मांतरण हेच नामांतरण आहे. कारण, आपण आपली जात महार किंवा हरिजन किंवा चोखामेळा सांगितले, तरी आपला द्वेष केला जातो. कारण या नावाचा त्यांना वीट आणि तिटकारा आलेला आहे. धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल. मुसलमान म्हणून घेणे, ख्रिश्चन म्हणून घेणे, बौद्ध म्हणून घेणे किंवा शिख म्हणून घेणे हे धर्मांतर तर आहेच, पण नामांतरही आहे; ते खरे नामांतर आहे. नामांतराला दुर्गंधी नाही.
हे नामांतर अमूलाग्र आहे, त्याचा शोध कोणीही करू शकणार नाही. परंतु चोखामेळा, हरिजन ह्या असल्या नामांतरापासून काही अर्थ सिद्ध होत नाही. जुन्या नावांची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल, तोपर्यंत तुम्हाला नामांतर करावेच लागेल. कारण नुसते हिंदू म्हणून चालणार नाही. हिंदू हा कोणी मनुष्यप्राणी आहे, असे कोणीच ओळखत नाही, असे सांगून भागणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा किंवा आज हे नाव, उद्या ते नाव असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये? असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा विचारला होता.
आपली आजची काय परिस्थिती आहे? निश्चितच बाबासाहेबांमुळे, भारतीय राज्यघटना, धम्मदीक्षा व कायद्यांमुळे काही अंशी पूर्वीच्या परिस्थितीमध्ये थोडासा फरक आहेच; मात्र परिस्थितीमध्ये जो बदल अपेक्षित होता, तसा झालेला नाही. देव-धर्मात, पूजा-अर्चेमध्ये आपली शक्ती व्यर्थ जाण्यापासून थांबवली आणि काबाड कष्ट करून पहिल्या-दुसऱ्या पिढीने नोकऱ्या मिळवल्या, चांगल्या हुद्द्यांवर गेले आणि आज दुसऱ्या-तिसऱ्या पिढीला सुगीचे दिवस आणण्यात हातभार लावला. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदीक्षा ही एका असमानतेच्या जुलमी व क्रूर व्यवस्थेला लाथाडून दुसरी वैज्ञानिक, संविधानिक, समता, बंधुता, न्याय व सर्वांना समान संधी इत्यादी अंतर्भाव असलेली व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प होता. परळच्या वरील सभेत ते बोलताना म्हणतात की, अस्पृश्य म्हणजे सर्वच अस्पृश्य. त्यामध्ये मांग, महार, मेहतर, चांभार, ढोर इत्यादी गलिच्छ काम करणारे व ज्यांना स्पर्श करणे स्पृश्य समाजाला शक्य नव्हते, असे सर्व अस्पृश्यांसाठीची ती सभा होय.
मात्र आपण पाहतो की, 1956 ला दीक्षा घेतेवेळी वरील अस्पृश्यांपैकी केवळ महार अस्पृश्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आदेशाप्रमाणे पालन करून, असेल त्या परिस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. इतर अस्पृश्य लोकांनी तसे केले नाही. कदाचित त्यांना तशी गरज भासली नाही किंवा त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला सल्ला हा प्रगतीचा व विकासाचा मार्ग असू शकतो, हे दुर्दैवाने समजले नसावे.
आज 2026 साली धर्मांतरित बौद्धांनी आपले सामर्थ्य दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन आणि आजही संघर्षातून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी मोठ्या दृढ विश्वासाने बाबासाहेबांचा शब्द आदेशाप्रमाणे घेऊन घरातील देव, धागे-दोरे फेकले, जनावरे उचलणे सोडले, मृत जनावरांचे मांस खाणे सोडले, उपाशीपोटी राहून त्रास सहन करून शिक्षणाची कास धरली, शिक्षणासाठी अनेक भौतिक वस्तूंचा त्याग केला. ‘शिका’ ह्या शब्दाचे लोण वाऱ्यासारखे पसरले, मोठ्या व महत्त्वाच्या जागा पटकाविण्याचा प्रयत्न करू लागले.
धर्मांतरित बौद्ध महारांची कठोर मेहनत, सातत्य, त्याग, संघर्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण-एक शब्दांवर असलेला दृढ विश्वास यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मेहनत व त्याग न करण्याची वृत्ती आणि आपल्या मधील असलेले अवगुण लपवण्यासाठी अनुसूचित 59 जातींपैकी काही अस्पृश्य आज धर्मांतरित बौद्धांवर असा आरोप करतात की, आरक्षणाचा फायदा केवळ धर्मांतरित बौद्धांनीच घेतला व आमच्या हिस्स्याचे आरक्षणसुद्धा यांनी घेतले, इत्यादी खोटे आरोप करून वाद निर्माण केलेला आपणाला पाहायला मिळतो. म्हणून मिळालेल्या आरक्षणामध्ये हिस्सेवाटणी करून जातीनिहाय वर्गीकरणावर भर देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. इथे पुन्हा प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते की, 1935 साली जेव्हा अनुसूच्या तयार करण्यात आल्या, तेव्हा त्या तयार करतेवेळी बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष प्रभावाने इंग्रजांनी त्या बनवल्या, ह्यामध्ये दुमत किंवा शंका नाही. मग प्रश्न उद्भवतो की, काय आजच्या शेड्युल्ड कास्ट/अनुसूचित जातींमधील 59 जातींनी प्रत्यक्षात भेटून बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जाती ह्या अनुसूचीमध्ये अंतर्भूत करण्यासाठी विनंत्या केल्या होत्या का? याचे उत्तर स्पष्टपणे नकारात्मकच आहे. कारण तेव्हा देशातील दलित, अस्पृश्य तथा ह्या 59 जातींची त्या गोष्टींचा विचार करणे इतपत परिस्थिती होती, असे म्हणू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना महार अस्पृश्यांव्यतिरिक्त इतर अस्पृश्यांबद्दलसुद्धा चिंता, कणव, आपुलकी होतीच, हे निश्चित. म्हणूनच इतरही अस्पृश्य जातींचा अंतर्भाव या अनुसूचीमध्ये केलेला आहे.
मग ह्या अनुसूचीमधील जातींपैकी महार या समुदायाचा 75 वर्षांनंतर विकास का दिसतो? प्रत्यक्षात पाहिलं तर महार या समाजातील लोकांपैकी पाच टक्के लोकांचा प्रत्यक्षात केवळ आर्थिक विकास झालेला असू शकतो; मात्र आजही सामाजिक बहिष्कार तेवढाच आहे, हे निश्चित. अन्यथा आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या अनुसूचित जातीतील सरन्यायाधीशांच्या दिशेने भर कोर्टात बूट फेकून मारण्याची हिंमत कोणाची झाली नसती. याचाच अर्थ असा की, आजही महार धर्मांतरित बौद्धांवर होत असलेला अन्याय हा आर्थिक निकषावर नसून जातीय द्वेषामुळे आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
शिकून मोक्याच्या जागा पटकवा, समाजाला विसरू नका, समाजासाठी योग्य करा, असा सल्ला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. सोबतच “मला शिकल्या-सवरल्या लोकांनी दगा दिला” असेही म्हटले होते. आम्ही शिकून मोठे झालो; मात्र या प्रवासात आम्ही समाजासाठी काय देणे लागतो, मोठ्या पदावर गेल्यावर समाजाच्या हिताचे काय करता येऊ शकते, याची जाण डोक्यात ठेवून जर वागलो असतो, तर आजची परिस्थिती निर्माण झालेली नसती, हे तेवढेच खरे. इतर लोकांना हे आरक्षण फुकटात आणि कोणतीही मेहनत किंवा त्याग न करता मिळालेले असू शकते. मात्र ह्या आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीचं रक्त जळलं, 24 तासांपैकी 21 तास सातत्याने अभ्यास करावा लागला. हे करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या प्राधान्यतेला मूठमाती द्यावी लागली. हयात असतानाच आपल्या लाडक्या मुलांना गमवावे लागले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीने दिलेले आरक्षण अबाधित राहण्यासाठी, किंबहुना इतर मागासवर्गीयांनासुद्धा त्यांचे आरक्षण मिळावे म्हणून मंडल आयोग खटल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हाच महार-दलित वर्ग आरक्षण वाचवण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. आपल्या छाताडावर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, कित्येक नवतरुणांचे आयुष्य उध्वस्त झाले, त्यांच्यावर फौजदारी खटले भरण्यात आले, कित्येकांना तुरुंगात पाठवण्यात आले आणि हे केवळ महार-धर्मांतरित बौद्ध लोकांनीच केले, यावर दुमत नाही.
आज मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ह्याच ढालीसारख्या कठोर समाजावर उपवर्गीकरणाचे, क्रिमिलिअरचे संकट येऊन, जातीच्या जनसंख्येच्या आधारावर पुढील वाटचाल निर्भर असल्याने आगामी जनगणनेत आपण बौद्ध, धर्मांतरित बौद्ध, नवबौद्ध किंवा महार असे न सांगता, जातीच्या रकान्यात — “अनुसूचित जाती; क्रमांक 37 (महार)” व धर्माच्या रकान्यात “बौद्ध” नमूद करून घेणे काळाची गरज आहे व फायदेशीर आहे.
कधी-कधी असे वाटते की, आपल्या बापाने “हिंदू धर्मात जन्मलो, पण मरणार नाही” हे म्हटले, धर्मांतरही केले, आमची प्रगती झाली; पण ह्या उपवर्गीकरणामुळे व समाजाला जास्तीत जास्त आरक्षणात वाटा मिळावा, ह्यासाठी तसे वरीलप्रमाणे लिहिणे योग्यच आहे. कारण हे प्रसंगावधान आहे. प्रसंगानुसार आपण बदललो नाही, सावध भूमिका घेतली नाही, तर येणाऱ्या काळात पुढच्या पिढीला त्याची झळ नक्कीच पोहोचणार. सोबतच अस्पृश्य समाजातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढत आहे. मॅट्रिकमध्ये 100 लोक असतील, तर बारावीमध्ये 50 राहतात, पदवीमध्ये 25 असतात, त्यापैकी पदव्युत्तर पदवीमधील 5-10 असतात आणि त्यापैकी सरकारी नोकरीमध्ये केवळ दोन ते तीन लोक लागतात, ही आजही वस्तुस्थिती आहे.
मग हजारो वर्षांपासून जे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजाश्रय घेऊन जीवन जगत आहेत, त्यांना आर्थिक परिस्थितीच्या आधारावर विशेष सवलती दिल्या जात असतील, तर 1956 पर्यंत आणि आजही हजारो वर्षांपासून जो घटक विकासाच्या जवळपासही नाही, त्यांची काय परिस्थिती असेल? याबद्दल विचार करणे अवघड आणि कठीण आहे. म्हणून वर्षानुवर्षे विकासाच्या गंगेमध्ये असलेले लोक जर आजही मागासलेले असतील, तर हजारो वर्षांपासून खितपत पडलेला हा समाज केवळ 1956 पासून ते 2026 पर्यंतच्या 70-75 वर्षांच्या काळात खरोखरच त्यांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली, असं म्हणता येईल का? समाजातील एखादा व्यक्ती मोठ्या पदावर गेला, म्हणून त्यामुळे त्या समाजाचा संपूर्ण विकास झाला, असे म्हणता येत नाही, हे सिद्ध होते. आजही अस्पृश्य समाजातील शिकल्या-सवरलेल्यांवर, आर्थिकदृष्ट्या सबळ, दिसायला देखणे, गाडी-घोडे असलेल्या व्यक्तींना खेड्यापाड्यात तर सोडाच, शहरातही कुणी भाड्याने खोली देत नाही. केवळ श्रीमंतीमुळे जर हा भेदभाव नष्ट झाला असता, तर देशाच्या सरन्यायाधीशाला जोडा फेकून मारला गेला नसता, हे तेवढेच खरे.
म्हणून आज प्रकर्षाने बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 मध्ये आजच्याच दिवशी दिलेल्या भाषणाची प्रकर्षाने आठवण होते.
बाबासाहेबांनी दिलेला आणि सांगितलेला मुक्तीचा मार्ग आम्ही पत्करला. वाटेत कितीतरी अडचणी आल्या, त्यांना सामोरे गेलो, प्रसंगी सामोरे जाऊ, यामध्ये तीळमात्र शंका नाही. निश्चितच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला मुक्तीचा मार्ग हा अतिशय विचार करून दिलेला आहे, तो मार्ग आम्हीही अतिशय विचारपूर्वक स्वीकारलेला आहे. आज समाजावर आलेला प्रश्न आणि संकट हे संपूर्ण समाजातील आम्ही समाजबांधव मिळून त्याला सामोरे गेलो पाहिजे आणि निश्चितच त्यावर सबळ तोडगा निघणार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मुक्तीच्या मार्गाचे आम्हीही काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो मार्ग इतरांनाही सांगून, आमची वैयक्तिक तथा समाजाची प्रगती कशी होईल, याकडेच लक्ष दिले पाहिजे. शाळाबाह्य मुलांची संख्या घटवण्याचा आणि ज्या होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. शिक्षण तथा सरकारी नोकऱ्यांचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मोठ्या, महत्त्वाच्या आणि मोक्याच्या पदावर गेल्यावर समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समग्र समाजाचा आणि पर्यायी देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला विकसित व प्रगल्भ समाज निर्माण होऊ शकतो.




