अहमदनगर : ब्राह्मण्यवादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि जय भीमचे निळे झेंडे वापरणे त्वरित थांबवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका स्पष्ट केली.
तसेच, अहमदनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न झाल्याने समाजात तीव्र नाराजी असून, पुतळा उघडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शहराध्यक्ष हनीफ शेख, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, जिल्हा सल्लागार जे. डी. क्षीरसाठ, युवक शहराध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्राह्मण्यवादी संघटनांवर गंभीर आरोप –
वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, ब्राह्मण्यवादी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्या बॅनरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरत आहेत. मात्र, त्याचवेळी त्या संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायमल्ली करत आहेत. हा प्रकार बाबासाहेबांच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात असून, त्यांनी लिहिलेल्या धर्मनिरपेक्ष घटनेला छेद देणारा आहे.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या नागरिकांनी एकत्र येऊन या प्रकारांना विरोध करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे. जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले की, हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे रेटणाऱ्या संघटनांनी बाबासाहेबांचा वापर थांबवावा. त्यांच्या विचारांचा केवळ राजकीय लाभासाठी वापर करणाऱ्यांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे.
स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या नेत्यांना आमिष दाखवून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे. या प्रवृत्ती समाजात जातीय तेढ आणि द्वेष पसरवत असून, भविष्यात यामुळे जातीय संघर्ष उद्भवण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून तीव्र नाराजी
नगर शहरात उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अद्यापही उघडण्यात आलेला नाही, तो झाकून ठेवण्यात आला आहे. यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी विचारांचा अजेंडा घेऊन जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी घेतलेल्या बैठकीवर वंचित बहुजन आघाडीने बहिष्कार टाकला आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदेश मिळताच समाजाच्यावतीने पुतळा खुला करण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे.
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...
Read moreDetails