जालना : परतूर विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यात आमदार लोणीकर पिता-पुत्रांसह भाजप पदाधिकाऱ्यांकडून दडपशाही करण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. या प्रकरणात दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी केले.
यावेळी आंदोलकांनी दडपशाहीच्या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक साळी यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसांत चौकशी अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा सचिव जमीर शेख, जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खरात, तालुका अध्यक्ष मंथा सुभाष जाधव, परतूरचे हनुमंत मोरे, घनसावंगीचे समाधान तोडके यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी चौकशी निष्पक्षपणे करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.





