मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याचे आई वडील बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलन करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांसह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. तसेच राहुल सोनपिंपळे आणि त्यांच्या AIISCA संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी साकीनाका येथील पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून पोलिसांशी त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी संवाद साधत ताब्यात घेतलेल्या सर्वांना तातडीने सोडण्याच्या सूचना केल्या.
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही हस्तक्षेप केला. त्यांनी मुंबई पोलीस दलातील वेस्ट झोन-३ चे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तक्षेपानंतर साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, यासाठी लढणाऱ्यांची पोलिसांतून सुटका करण्यात आली आहे.
जोपर्यंत साहिल वाकोडे प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. जर प्रा. डुल्ला यांना अटक करण्यात आली नाही तर सम्यक विद्यार्थी आंदोलन मंत्रालयावर मोर्चा काढेल असा इशारा मुंबई सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे आनंदराज घाडगे यांनी दिले आहे.





