मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. टायगर श्रॉफ फुटबॉलचा सामना खेळून घरी परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला. या घटनेनंतर अभिनेता आणि अन्य दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार टायगर श्रॉफ यांच्यावर थेट करण्यात आलेला नसून त्यांच्या गाडीवर करण्यात आला आहे. या घटनेत अभिनेता सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.





