नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीपासूनच “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली होती.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने विविध स्तरांवर चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे प्रयत्न केले. केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांची तसेच सोनम वांगचूक यांची भेट घेतली होती. आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच NEET पेपरफुटी प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली होती. या आश्वासनानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले.
या आंदोलनाला देशभरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. विशेषतः वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाला सक्रिय समर्थन दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जंतर-मंतर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवत त्यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते.
या बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा देत अनेक ठिकाणी आपले व्यावसायिकांनी व्यवसाय व उद्योगधंदे स्वइच्छेने बंद ठेवली. अत्यावश्यक सेवा वगळता अनेक शहरांतील बाजारपेठा बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील विविध जिल्ह्यांत मोर्चे, रॅली, निदर्शने आणि धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध केला होता. महाराष्ट्र बंदमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.





