Mirabai Chanu Asian Games Silver Medal: ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेतही पदक पटकावले आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चानूने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करत आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
मीराबाई चानूच्या कारकिर्दीत ऑलिम्पिक रौप्यपदक, विश्वविजेतेपद तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकांसह अनेक मोठ्या स्पर्धांतील यशाचा समावेश आहे. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकाची उणीव तिच्या पदक संग्रहात कायम होती. नागोया येथे मिळवलेल्या रौप्यपदकामुळे ही उणीव आता भरून निघाली आहे.
चानूच्या या कामगिरीचे आणखी एक विशेष महत्त्व आहे. १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने रौप्यपदक जिंकल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळाले नव्हते. तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मीराबाई चानूने भारताला पुन्हा या क्रीडा प्रकारात पदक मिळवून दिले.
यशासोबतच कारकिर्दीत अपयश आणि दुखापतींचाही सामना करणाऱ्या मीराबाईने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मीराबाई चानूच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय वेटलिफ्टिंगसाठीही आशियाई क्रीडा स्पर्धेतील २८ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली आहे.





