नांदेड : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन (दक्षिण) व प्रा. राज अटकोरे (उत्तर) यांच्या सोबत समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीस समविचारी पक्ष व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबन बारसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भगवानराव आलेगावकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अब्दुल शफीफ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी, काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल गफार, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, गटनेते प्रशांत इंगोले, जिल्हा महासचिव रवी पंडित, नगरसेवक राहुल सोनसळे, शेख बिलाल, शेख रिजवान, कुलदीप राक्षमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत दि. २३ जुलै रोजीचा महाराष्ट्र बंद नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात व्यापक व शांततापूर्ण पद्धतीने यशस्वी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दि. २३ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता महात्मा फुले पुतळा (आयटीआय कॉर्नर), नांदेड येथे सर्व पक्ष, संघटना व नागरिकांनी एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थी, पालक, व्यापारी, शेतकरी, कामगार, एस.टी. कर्मचारी, ऑटो रिक्षा चालक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व न्यायप्रिय नागरिकांनी या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.





