मुर्तिजापूर : स्मार्ट मीटर तात्काळ हटवावेत, बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच भूमिहीन शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचे फॉल्टी मीटर नसतानाही ग्राहकांच्या घरांवर स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटरमुळे अनेक ग्राहकांना अवाजवी वीजबिले येत असून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे हे स्मार्ट मीटर तात्काळ हटवून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
Also Read : पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार
तसेच, बियाणे कंपन्यांनी पुरविलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर शासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
याशिवाय, शासनाची पडीत जमीन मागील १५ ते २० वर्षांपासून कसणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांच्या पिकांची नासधूस होऊ नये तसेच त्यांच्या शेतीमध्ये गुरेढोरे चारली जाऊ नयेत. अशा घटना घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
Also Read : सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई
या सर्व मागण्यांचे निवेदन मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






