नवी दिल्ली : NEET UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपर लीक आणि ऑनलाइन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने टेलिग्राम या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घातली आहे. मात्र या निर्णयावर टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पावेल डुरोव यांनी तीव्र आक्षेप नोंदवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डुरोव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, काही व्यक्तींनी लीक झालेल्या प्रश्नपत्रिका शेअर केल्याच्या आरोपावरून संपूर्ण प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे भारतातील १५ कोटींहून अधिक कायद्याचे पालन करणारे सामान्य वापरकर्ते अडचणीत आले, मात्र प्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला नाही.
त्यांच्या मते, टेलिग्रामवरील बंदी ही “सामूहिक शिक्षा” (Collective Punishment) ठरली आहे. कारण, पेपर लीकशी संबंधित सामग्री इतर डिजिटल माध्यमांवर सहजपणे पोहोचली. त्यामुळे अशा प्रकारच्या बंदीमुळे परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या मूळ कारणांवर उपाय होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा टेलिग्रामसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक मानला जातो. वैयक्तिक संवाद, शैक्षणिक उपक्रम, व्यावसायिक कामकाज आणि विविध समुदायांमधील संवादासाठी देशातील कोट्यवधी नागरिक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने या कारवाईचे समर्थन केले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अनेक टेलिग्राम चॅनेल्सवर बारकाईने नजर ठेवण्यात येत होती. काही चॅनेल्सवर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात होते. तसेच उमेदवार आणि पालकांकडून लाखो रुपयांची मागणी करून फसवणूक केली जात असल्याचेही निदर्शनास आले होते. NTA च्या म्हणण्यानुसार, काही संघटित कॉपी सिंडिकेट आणि सायबर फसवणूक करणाऱ्या गटांकडून टेलिग्रामचा वापर केला जात होता. या पार्श्वभूमीवर परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.





