अकोला : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील प्रवेशासाठी राज्य सरकारने लागू केलेली ‘१ किलोमीटर अंतराची अट’ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हजारो विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. या निर्णयाचे वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत करण्यात आले असून, न्यायालयीन लढाई लढणारे ॲड. बोधी रामटेके आणि ॲड. दीपक चटप यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. मात्र, राज्य सरकारने अलीकडेच नवीन नियम लागू करत विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर परिसरातील शाळाच निवडण्याची अट घातली होती. या नियमानुसार, जर विद्यार्थ्याच्या घराजवळ १ किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा उपलब्ध असेल, तर त्या विद्यार्थ्याला खासगी शाळेत प्रवेश मिळणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. या नियमामुळे अनेक गरीब व वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी हिरावली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या ‘जाचक’ नियमाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या १ किलोमीटर अंतराच्या नियमाला स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सभागृहात या नियमाबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोपही पुढे आला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पालकांवरील निवड प्रक्रियेचे बंधन शिथिल झाले असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयाचे स्वागत करत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. “राज्य सरकार सातत्याने शिक्षण हक्क कायद्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. १ किलोमीटरची अट लादून गरीब मुलांना दर्जेदार शिक्षणापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे वंचित समाजातील विद्यार्थी आणि पालकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे,” असे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.






