ॲड. प्रकाश आंबेडकर : अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे
मुंबई : बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्यावर होणाऱ्या हिंसा आणि भेदभावावर कोणीच काही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस दोघेही शांत का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बांगलादेशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धार्मिक अल्पसंख्याक बौद्ध आहेत. ज्यांना भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. परंतु, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही सोयीस्करपणे गप्प का आहेत.
बांगलादेशच्या चितगाव हिल ट्रॅक्ट्स (CHTs) मध्ये चकमा समुदायातील आदिवासींवर पद्धतशीरपणे हल्ले करण्यात आले आहेत. त्यांची घरे जाळण्यात आल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
बौद्धांप्रमाणेच ते देखील बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी भाजप आणि काँग्रेसच्या गोष्टींमधून गायब का आहे, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच या समुहांच्या मानवी हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.