27 च्या MVA च्या बैठकीचे अद्याप वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही
अकोला : आम्ही पहिल्यापासून म्हणत आहोत की, आम्हाला महाविकास आघाडीत यायचं आहे आणि आमची ही भूमिका कायम आहे. महाविकास आघाडीत यायला आणि इंडिया आघाडीत यायला आम्ही उत्सुक आहोत. याबाबत माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.
महाविकास आघाडीच्या चार बैठका झालेल्या आहेत. आम्हाला फक्त दोनच बैठकींना निमंत्रित केले होते. वंचित बहुजन आघाडी अनेक वर्षे रस्त्यावर उतरून भाजप आणि मोदी विरोधात कठोर भूमिका घेत आहे. त्या पक्षाला तुम्ही जवळ करत नाही. आघाडीतील मित्रपक्षाच्या प्रतिनिधीला तुम्ही चार चार तास बैठकीच्या बाहेर बसवता, असं जगात कुठेही होत नाही. असे म्हणत पुंडकर यांनी संजय राऊत यांना विवेकी होण्याचा सल्ला दिला आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असता, तर आम्हाला बैठकांना नियमित बोलावलं असतं आणि आमच्याशी चर्चा केली असती. परंतु, असं होताना दिसत नाही. या क्षणापर्यंत 27 तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे कोणतेही निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही. निमंत्रणच मिळाले नसल्याने जायचं किंवा न जायचं याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या भाजप – मोदी आणि संघाविरोधात अतिशय आक्रमक भूमिका कोण घेत असेल, तर ते माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. निवडणुका समोर येत आहेत, कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील. आम्ही म्हणत आहोत की, एकत्र बसून चर्चा करुयात. जागावाटप कसं झालं ते आम्हाला सांगा. आम्हाला सामील करून घ्या, तर हे आम्हाला बाहेर ठेवत आहेत.निवडणुका समोर असताना, किती दिवस हा खेळ चालणार आहे ? असा सवालही पुंडकर यांनी उपस्थित केला.
सर्वांनी एकत्र राहणे महत्त्वाचे…
भाजप – आरएसएसचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी व्हायला नको. यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडीचे सर्व निर्णय आम्हाला टी.व्ही.च्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून समजतात, हेच आमचं दुःख असल्याचेही पुंडकर यांनी म्हटले आहे