औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आमखास मैदानावर आयोजित भव्य जाहीर सभेत जनसागराचा महापूर लोटला होता. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात प्रस्थापित मुस्लिम नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, औरंगजेबाचा प्रश्न असो किंवा हिजाबचा मुद्दा या दोन्ही प्रसंगी एक तरी नगरसेवक मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला का? मुस्लिम नगरसेवकांनी मोर्चे काढले का? उत्तर प्रदेशात मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले, तेव्हा त्याविरोधात एकही मुस्लिम नगरसेवक औरंगाबाद मध्ये रस्त्यावर उतरला का? अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.
धार्मिक नेतृत्वावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीत मौलवी, मुफ्ती आणि मुस्लिम संघटन जे मुस्लिमांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्याच बाजूने उभे राहिले पाहिजे ही भूमिका ते का घेत नाहीत.
मुफ्ती, मौलवींनी मित्र जोडायला शिकावे तेव्हाच आरएसएस आणि भाजपला तोंड देऊ शकाल. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

भाजपवर ‘बदलापूर’ प्रकरणावरून टीका
भाजपला मतदान करू नका, कारण व्यभिचाऱ्यांना भाजप स्वीकृत नगरसेवक करत आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले आहे. असा व्यक्ती आरएसएस व भाजप कार्यकर्त्यांच्या घरी येईल. यामुळे आरएसएस आणि भाजपचे कार्यकर्तेही असुरक्षित झाले आहेत. अशी टीका त्यांनी केली.
मोदींच्या धोरणांमुळे देश संकटात :
नरेंद्र मोदी आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम देशातील सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय मंचावर मोदी सरकारमुळे देशाची झालेली दुरावस्था याकडे लक्ष वेधत, मोदींना धडा शिकवायचा असेल तर भाजपला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले.
औरंगाबाद महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

औरंगाबादमध्ये जनसागर उसळला :
सायंकाळी झालेल्या या सभेसाठी शहरातील कानाकोपऱ्यातून नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. आमखास मैदान जनसमुदायाने पूर्णपणे ओसंडून वाहत होते. ‘जय भीम’ आणि ‘वंचित बहुजन आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेने निवडणुकीच्या वातावरणात मोठी चुरस निर्माण केली आहे. या सभेला स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






