लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १० आणि ११ सप्टेंबर रोजी ‘कस्तुराई’ मंगल कार्यालय, औसा-बार्शी रिंग रोड, लातूर येथे पार पडणार असून उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.
पहिला दिवस : १० सप्टेंबर
शिबिराची सुरुवात सकाळी ९ वाजता शिबिरार्थींच्या नोंदणीने होईल. सकाळी ११ वाजता बाळासाहेब आंबेडकर यांच्या उद्घाटनपर भाषणाने पहिल्या सत्राची सुरुवात होईल. दुपारी १ ते २:३० या सत्रात राज्य प्रवक्ते मा. सोमनाथ साळुंके “प्रभागाचा अभ्यास, गट-गण अभ्यास व उमेदवार निवडीचे निकष” या विषयावर मार्गदर्शन करतील.
दुपारी ३:३० ते ४:३० या तिसऱ्या सत्रात केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. डॉ. नितिन ढेपे “प्रचार माध्यमे आणि सोशल मीडियाचा वापर” या विषयावर माहिती देतील.
सायं. ५ ते ६:३० या शेवटच्या सत्रात महाराष्ट्र युवक महासचिव मा. राजेंद्र पातोडे “बूथ बांधणी, शाखा स्थापना, सभासद नोंदणी, पक्ष शिस्त व अंतर्गत संवाद” यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम रात्रीच्या जेवण व मुक्कामाच्या सोयीने संपन्न होईल.
दुसरा दिवस : ११ सप्टेंबर
दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ या पाचव्या सत्रात प्रदेश प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग “बौद्ध व मुस्लिम समाज संवाद” या विषयावर विचार मांडतील. दुपारी १२ ते १ या सहाव्या सत्रात राज्य कार्यकारिणी सदस्य मा. अविनाश भोसीकर “ओबीसी आरक्षणाची आव्हाने व ओबीसी-मराठा संघर्ष” या विषयावर मार्गदर्शन करतील.
दुपारी २ ते ४ या समारोपीय सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष. ॲड. बाळासाहेब आंबेडकर स्वतः “वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन सूत्र” व “स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रणनीती” यावर मार्गदर्शन करून शिबिराची सांगता करतील. दुपारी ४ वाजता आभार प्रदर्शनानंतर जेवणाने शिबिराचा समारोप होईल.
हे दोन दिवसीय शिबिर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.