सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातही पावसाच्या पाण्याने मोठा हाहाकार माजवला असून शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अनवली गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची स्थिती जाणून घेतली.
सुजात आंबेडकर यांनी पीडित शेतकरी व नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेतजमिनीतील पिके, जनावरांच्या चाऱ्याचे झालेले नुकसान, घरांची पडझड, दैनंदिन जगण्यावरील आलेले संकट यांची त्यांनी माहिती घेतली. या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी करत त्यांनी तहसीलदारांशी फोनवरून संवाद साधला व तातडीने मदत पोहोचवून योग्य नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले, “पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा. केवळ पंचनामे करून न थांबता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात द्यावा. वंचित बहुजन आघाडी पीडित जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”
या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, तसेच पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.