औरंगाबाद : फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचा वैचारिक व सांस्कृतिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे शाहीर मेघानंद बाबुराव जाधव यांना वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रा. डॉ. करुणा मेघानंद जाधव यांना प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण महिला) मधून उमेदवारी देण्यात आली असून, या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीने सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणात मानाचे स्थान दिले आहे.
शाहिरीतून संघर्षाचा वारसा
शाहीर मेघानंद जाधव यांनी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या पहाडी आवाजातून आणि शाहिरीतून बहुजन समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या प्रचारासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. वामनदादांच्या विचारांचा वारसदार म्हणून त्यांनी जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच सामाजिक आणि वैचारिक कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ही उमेदवारी केवळ निवडणूक लढवण्यापुरती मर्यादित नसून, फुले–शाहू–आंबेडकरांचे विचार स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. उपेक्षित आणि वंचित घटकांचा आवाज थेट प्रशासनात बुलंद करणे हा या उमेदवारीचा मुख्य उद्देश आहे.






