पुणे : विचारवेध चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ लेखक, विचारवंत, निवडणूक विश्लेषक आणि मार्केटिंग तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले आनंद करंदीकर यांचे मंगळवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आनंद करंदीकर यांनी दीर्घकाळ विविध सामाजिक संघटना व संस्थांशी कार्यात्मक नाते जपले.
समाजप्रबोधन, लोकशाहीची सशक्तीकरण प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थेचे विश्लेषण, मतदारांच्या मानसिकतेचे अभ्यासपूर्ण परीक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या विचारपूर्ण लेखनामुळे ‘विचारवेध’ चळवळीला दिशा मिळाली होती.
करंदीकर हे ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचे चिरंजीव होते. कुटुंबातील साहित्यिक परंपरेचा वारसा त्यांनी आपल्या विश्लेषणात्मक लेखनातून आणि प्रभावी भाषणातून पुढे नेला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
निवडणूक राजकारण, समाजमन, मार्केटिंग तत्त्वे आणि आधुनिक संप्रेषण तंत्रांचा प्रभाव या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून, संशोधक आणि तरुण अभ्यासकांसाठी ती मार्गदर्शक मानली जातात.
आनंद करंदीकर यांच्या निधनाने विचारविश्व, सामाजिक क्षेत्र, साहित्यवर्तुळ आणि अभ्यासकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने प्रबोधनशील लेखनाचा एक समर्थ आवाज कायमचा शांत झाला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आदरांजली –
डॉ. आनंद करंदीकर यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. डॉ. करंदीकर हे युक्रांतचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. डॉ. करंदीकर यांनी विचारवेध संमेलनाचे माध्यमातून सातत्याने ५-६ वर्षे ऑनलाइन मंचावरून विविध विषयांवर चर्चा घडवून आणली होती.
शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहोचवावे? हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय राहिलेला आहे. लेले Marketing and Econometric Consultancy Services (METRIC) ही मॅनेजमेंट आणि मार्केटिंग सल्लागार उभी करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
वंचितांच्या स्वतंत्र राजकारणाबद्दल प्रचंड अस्था असणारा हा मित्र होता. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. आनंद करंदीकर यांना आंबेडकर परिवार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनम्र आदरांजली!






