Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मोठ्या मनाचा मोठा माणूस

mosami kewat by mosami kewat
March 4, 2026
in Uncategorized
0
मोठ्या मनाचा मोठा माणूस
       

– संजय मेश्राम

प्रा. रणजित मेश्राम लोकमतला पत्रकार असताना त्यांनी आपल्या तुफान फलदाजीनं एक काळ गाजवला होता. त्यांची प्रत्येक बातमी, प्रत्येक लेख म्हणजे फोर आणि सिक्स असायचे. त्यांची त्या काळातील भाषणंही तशीच धुंवाधार.

खूप आधी १९८८ मध्ये ब्रम्हपुरीला झालेल्या विक्रमी गर्दीच्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात त्यांना पहिल्यांदा बघितलं, ऐकलं होतं. विशेष म्हणजे कथाकथन कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. डॉ. यशवंत मनोहर अध्यक्ष होते. संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागुलही सहभागी झाले होते.

पत्रकार सिद्धार्थ सोनटक्के अकाली गेल्यानंतर त्यांनी लोकमतला एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘सिद्धार्थ प्रत्येक संधीचं सोनं करायचा. पण त्या सोन्याचं पुढं काय करायचा?’

ते लोकमतला असताना त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याची संधी मला मिळाली नाही. ते बाहेर पडल्यानंतर माझा प्रवेश झाला. लोकमत सोडल्यानंतरही कधी अधूनमधून ते कार्यालयात येत. जुन्या, नव्या सहकाऱ्यांच्या मध्ये बसून गप्पा करीत. एखादं हिंदी गाणंही गुणगुणत. मी त्यात सर्वात नवोदित. हा कुणी तरी नवीन मुलगा आहे, एवढंच त्यांना ठाऊक. नावही माहीत नसावं.

एकदा अशाच गप्पा सुरु होत्या. 

मी आपलं ऐकता ऐकता काही कामही करीत होतो. म्हणजे बातमी लिहीत होतो. त्यांचं लक्ष गेलं. ते म्हणाले, ‘थांब रे. काय सांगतो ते ऐक आधी.’ तेव्हाचे छायाचित्रकार शंकर महाकाळकर हे त्यांचे मित्रच होते. त्यांना ते खूप मानत. त्यांचे अनेक किस्से सांगत. त्यांनी काढलेलं इंदिरा गांधींचं तलवार उगारलेलं छायाचित्र (मिस्टर रेड्डी, आय अम रेडी), बंद दरम्यान ट्रकचालकांच्या मदतीनं काढलेली छायाचित्रं, केलेलं वृत्तांकन याविषयी कितीतरी रंजक गोष्टी सांगत असत. अशाच गोष्टींविषयीचं त्यांचं स्तंभलेखनही लोकप्रिय ठरलं होतं. ‘ढळत्या पदराच्या कडा’ हा त्यातील एक गाजलेला लेख.

एकदा दुपारच्या वेळी त्यांचा कार्यालयात फोन आला. मीच घेतला. म्हणाले, कोण बोलतो?

माझं नाव सांगितलं. ते म्हणाले, कोण मेश्राम? काय करतो तू? तुला इंदोरा तरी ठाऊक आहे का? कोण ओळखतं तुला इंदोऱ्यामध्ये? 

मी सहकाऱ्याकडे फोन दिला. आपल्या कामात मग्न झालो. मला काही वाटलं नाही.

पुढं काही दिवसांनी विद्यापीठ लायब्ररी इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने दिवसभरासाठी परिसंवाद आणि विविध सत्रांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. भाऊ लोखंडे विभागाचे प्रमुख होते. मंचावर नागेश चौधरी, प्रा. रणजित मेश्राम, काँग्रेस नेते नितीन राऊत, रा. स्व. संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य आदी होते. मी वृत्तांकनासाठी श्रोत्यांमध्ये बसलो होतो. डॉ. लोखंडे यांनी मला बघितलं होतं. पाहुण्यांचा स्वागत समारंभ सुरू होता.

भाऊ लोखंडे माइकवर बोलत होते. कार्यक्रमाची रूपरेषा सांगत होते. वैद्य, राऊत यांच्यानंतर चौधरी यांचा क्रमांक होता. भाऊ म्हणाले,  नागेश चौधरी यांचं स्वागत कण्यासाठी मी एका अशा व्यक्तीला आमंत्रित करतो, ज्याचा उर्दूचा चांगला अभ्यास आहे. परवीन शाकिर त्याची आवडती शायरा आहे,  जो मोमीनपुऱ्यातील व्यक्तीलासुद्धा उर्दू शिकवू शकतो. (ही तर अतिशयोक्तीची हद्द झाली. जर्रे को आफताब बनाना…) त्यांनी माझं नाव घेत मला स्टेजवर बोलावलं. मी चौधरी यांना पुष्पगुच्छ देत होतो, त्यावेळी बाजूला बसलेले प्रा. मेश्राम हळू आवाजात म्हणाले, अच्छा, तुम्हीही आलात का!

त्यांच्यासाठी माझी ही नवीनच ओळख होती.

कार्यक्रमात दोन सत्रांच्या मध्ये लंच ब्रेक होता. हिरवळीवर व्यवस्था केली होती. माझे एक मित्र होते राजानंद. (तेही मेश्रामच.) आम्ही जेवण करीत असताना प्रा. रणजित मेश्राम हातातील प्लेट सांभाळीत आमच्या दिशेनं येताना दिसले. जवळ येत म्हणाले, माफ करा मेश्राम. तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली. मी तुम्हाला फोनवर चुकून बरंच काही बोललो होतो.

मी म्हटलं, अहो मी विसरूनही गेलो. मला काही आठवत नाही. तुम्ही पण विसरा.

आम्ही तीन मेश्रामांनी गप्पागोष्टी करीत एकत्र जेवण केलं.

या प्रसंगातून मला त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसला. मोठ्या माणसांना चूक कबूल करण्यात, माफी मागण्यात काहीच संकोच वाटत नाही. माझा त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढला.

एकदा आंबेडकरी समाजाची आस्था असलेल्या विषयावर एक बातमी केली होती. त्यात एक जबाबदार व्यक्ती म्हणून इतरांसोबतच प्रा. मेश्राम यांचंही म्हणणं काय, ते मला बातमीत हवं होतं. त्यांना विचारलं, तर ते म्हणाले, मला कशाला मध्ये ओढता? मला यावर काहीही बोलायचं नाही.

मी बातमीत उल्लेख केला की प्रा. मेश्राम यांनी या विषयावर बोलायचं टाळलं. प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा संतप्त फोन. ‘तुम्ही माझा असा उल्लेख का केला? आजपासून तुमचा माझा संबंध संपला. तुम्ही मला फोन करायचा नाही, मी तुम्हाला फोन करणार नाही…’

माझं काहीएक ऐकून न घेता त्यांनी फोन कट केला.

आपला समाज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत जागरूक असावा, यासाठी ते अशा विषयांवर सातत्यानं पोस्ट लिहीत असत. त्यातही सामाजिक बांधिलकी, समता, न्याय, बंधुता हा अदृश्य धागा असायचा.

 पाच सहा दिवसांच्या खंडानंतर त्यांनी लिहिलेली एक पोस्ट माझ्या व्हाट्स अपवर आली. मला आश्चर्य वाटलं. मी सहज चौकशी केली. मेसेज करून विचारलं, ‘सर आपली पोस्ट मला चुकून आलेली आहे का?’

ते म्हणाले, ‘नाही हो. मुद्दाम पाठवली. काही गोष्टी विसरून जायच्या असतात. किती दिवस धरून ठेवायच्या!’

असे होते प्रा. रणजित मेश्राम. मागील वीस वर्षांत भेट नाही. आता कधी होणार पण नाही. ते आजारी होते, असं ऐकलं होतं, पण असं काही कानी पडेल, याची कधी कल्पना केली नव्हती. ते बरे होतील, त्या दिवसाची वाट पाहत होतो. आज नको ती बातमी धडकली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सहजच ओठांवर आलं, मोठ्या मनाचा मोठा माणूस!

प्रा. रणजीत मेश्राम यांना प्रबुद्ध भारतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!


       
Previous Post

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

Next Post

गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

Next Post
गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

गरिबांच्या घरांवरून 'राजगृहा'चा हुंकार!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट
बातमी

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

by mosami kewat
June 14, 2026
0

नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू...

Read moreDetails
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026
नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

June 14, 2026
विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

June 13, 2026
'निगेटिव्हिटी'चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

‘निगेटिव्हिटी’चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

June 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home