मालेगावात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा!
मालेगाव : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पंचशील नगर, कॅम्प येथे उत्साहात पार पडली. या सभेत बोलताना आंबेडकर यांनी मतदारांना प्रलोभनांना बळी न पडण्याचे आणि निस्वार्थ व विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.
“मतदान हा मतदारांचा मूलभूत अधिकार असून तो कोणत्याही दबावाशिवाय बजावला पाहिजे. मालेगाव महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल,” असे आंबेडकर यांनी सांगितले.

त्यांनी पुढे राज्य सरकारवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गेल्या सात वर्षांपासून जाणीवपूर्वक अडथळे आणल्याचा आरोप केला. “प्रस्थापित पक्ष आणि मनुवादी विचारसरणीचे प्रतिनिधी पुन्हा निवडून आल्यास लोकशाही निवडणूक पद्धतीवरच गदा येऊ शकते,” अशी टीका त्यांनी केली.
मुस्लिम समाजातील प्रतिनिधींवर टीका :
सभेत बोलताना आंबेडकर यांनी मुस्लिम समाजातील राजकीय नेतृत्वावरही टीका केली. “जात–धर्माच्या नावाने मतदान मागितले जाते, मात्र सभागृहात लोकांचे प्रश्न मांडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गप्प बसण्याचे प्रकार घडतात,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जात–धर्म न पाहता शहराच्या विकासासाठी सक्षम उमेदवार निवडणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रलोभनांपासून सावध राहा – आंबेडकर
मतदारांनी पैशाचे वाटप, दारू, मटण यासारख्या प्रलोभनांना बळी न पडण्याचा सल्ला देत आंबेडकर म्हणाले, “लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मनुवादी सरकारला व शिवसेना–भाजपाला पराभूत करणे आवश्यक आहे. प्रलोभन स्वीकारून मतदान करणे म्हणजे स्वतःच्या शहराचे भविष्य विकण्यासारखे आहे.”

या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख, कोअर कमिटी सदस्य जितरत्न पटाईत, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप, उपाध्यक्ष कैलास लोहार, आनंद शिनगारे, जगदीश खरे, राम बस्ते तसेच अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांमध्ये कुणाल पिंपळे, शुभांगी नेतकर, अमोल मोरे, अश्विनी पटाईत, शेख शोएब इस्राइल व राहुल पवार हे उपस्थित होते.






