पुणे : पुणे जिल्ह्यातील देहू परिसरातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला प्राचीन लेणींचा वारसा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी वाचवण्यासाठी आता ‘संविधानप्रेमी’ आणि ‘वारकरी’ एकवटले आहेत. भूमाफिया आणि एमआयडीसीच्या अतिक्रमणाविरोधात मधुसूदन पाटील महाराज यांच्या नेतृत्वाखाली १० मार्च २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
खेड आणि मावळ तालुक्यातील भंडारा, भामचंद्र आणि घोराडा हे डोंगर केवळ निसर्गाचा भाग नसून ते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचिताचे केंद्र आहेत. या डोंगरांमध्ये प्राचीन बौद्धकालीन आणि जैनकालीन लेणी आहेत. तसेच याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी ध्यानधारणा करून अभंग निर्मिती केली होती. मात्र, २००७ पासून या परिसरावर बिल्डर लॉबी आणि एमआयडीसीची वक्रदृष्टी पडली असून, या पवित्र साधनाभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मधुसूदन पाटील महाराज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २०११ मध्ये राज्य शासनाने या डोंगरांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करणारी अधिसूचना काढली होती. परंतु, राजकीय दबाव आणि व्यावसायिक हितसंबंधांमुळे या अधिसूचनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या अन्यायाविरोधात आता संविधानिक मार्गाने लढा तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की:
“तुकोबांच्या समतावादी विचारांचा आणि निसर्गप्रेमाचा वारसा जपण्यासाठी वारकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे ही काळाची गरज आहे. १० मार्चच्या आझाद मैदानावरील आंदोलनात सर्व संविधानप्रेमी, समतावादी आणि निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
– भंडारा आणि भामचंद्र डोंगराबाबतच्या २०११ च्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
– ऐतिहासिक लेणी आणि निसर्ग वारसा नष्ट करणाऱ्या प्रकल्पांना पायबंद घालावा.
– संतभूमीचे पावित्र्य जपण्यासाठी या क्षेत्राला पूर्णतः संरक्षित क्षेत्र घोषित करावे.
संत तुकोबांच्या “वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे” या विचारांचे जतन करण्यासाठी सुरू झालेला हा लढा आता संपूर्ण महाराष्ट्राचा लढा बनणार, अशी चिन्हे दिसत आहेत. कारण आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः या लढ्याला सामील होणार आहे.





