मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हवाई दलाच्या विमान गमावल्याप्रकरणी सडकून टीका केली आहे.
इंडोनेशियातील भारताच्या संरक्षण अताशे यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत, राजकीय नेतृत्वाच्या बंधनांमुळे हवाई दलाला सुरुवातीलाच “काही विमाने” गमवावी लागली होती, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
तसेच मे महिन्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनीही भारताच्या विमान नुकसानीची बाब मान्य केली होती, असे आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. याच संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना उद्देशून अनेक प्रश्न विचारले आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेले प्रश्न:
१) पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, हे खरे आहे का?
२) तुमच्या नेतृत्वाच्या चुकांमुळे आम्ही विमाने गमावली का!?
३) तुम्ही या काळात राष्ट्राशी खोटे बोललात का?
४) संघर्षात आम्ही किती विमाने गमावली?
५) आम्ही कोणतेही हवाई दल कर्मचारी गमावले का?
ॲड. आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना या प्रश्नांबाबतचा संभ्रम दूर करून संपूर्ण देशाला उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सरकार यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.