वंचित बहुजन युवा आघाडीचे अभिनव आंदोलन
अमरावती : वरखेड फाटा ते अंजनसिंगी या महत्वाच्या मार्गाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले असून, आजही त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी उदासीनतेची भूमिका घेतल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी अभिनव आंदोलन उभारले.
“खासदार आणि आमदार गाढ झोपेत आहेत. त्यांची झोप पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी आपली सुरक्षा पाहून वाहने हळू चालवावीत,” असे आवाहन करणारे फलक रस्त्यावर लावून संताप व्यक्त करण्यात आला.
दोन वेळा भूमिपूजन, तरीही रस्ता जैसे थे
सन 2023 मध्ये या रस्त्याकरिता अर्थसंकल्पातून 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तत्कालीन खासदार नवनीत राणा आणि तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर यांनी दोन वेळा भूमिपूजन करून काम लवकर सुरू होईल अशी घोषणा केली होती. परंतु दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही आजतागायत कामाला सुरुवात झालेली नाही. विद्यमान खासदार बळवंत वानखडे व आमदार राजेश वानखडे यांनी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
संतप्त ग्रामस्थांचा इशारा
वरखेड फाटा ते अंजनसिंगी मार्ग हा उंबरखेड, धामंत्री, भारसवाडी, आखतवाडा, अंजनसिंगी मार्गे पुलगाव व यवतमाळसाठी वाहतुकीचा महत्वाचा दुवा आहे. पुढील महिन्यात समर्थ आडकोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला हजारो भाविक दाखल होणार असून या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.”
जर लवकरात लवकर काम सुरू झाले नाही, तर खासदार-आमदार यांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून त्यांना झोपेतून उठवू,” असा इशारा सागर भवते यांनी दिला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, सचिन जोगे, सुनील बोके, रामदास मारबदे, सागर गोपाळे, नंदु बन्सोड, अवी चव्हाण, इकबाल शाहा, अजय भवते, परिमल जवंजाळ, निरंजन मेश्राम, मुस्ताक शाहा, अनिल सोनोने, नितीन थोरात, महेश दाहाट, रुपाली मुंद्रे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.