मुंबई : पैगंबर बिल संसदेत सादर झाले असून ती आता हाऊसची प्रॉपर्टी झाली आहे. तसेच संसदेने अशा प्रकारच्या कायद्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. अशी ही प्रॉपर्टी कायद्याच्या स्वरूपात नक्की भविष्यातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी अस्तित्वात येईल आणि अशा प्रकारचे कायदे धार्मिक राजकारण आणि जातीय तेढ निर्माण करून केल्या जाणाऱ्या राजकारणाला आळा घालेल. मुस्लिम समाजाने सक्रिय राजकारणात येऊन स्वतःचा आवाज भारतीय राजकारणात बुलंद केला पाहिजे. निव्वळ पाठिंबा देणारा मतदाता न होता भविष्यातील पिढीसाठी सक्षम उमेदवारदेखील निर्माण केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडी संचालित https://paigambarmohammadbill.org/ या वेबसाईट चे उदघाटन देखील याप्रसंगी करण्यात आले.
पैगंबर बिलमधील मसुदा आणि तरतुदी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहेत. हा सोहळा साकीनाका येथील दारुल उलूम अली हसन अहले सुन्नत शाळेच्या सभागृहात झाला. तसेच वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सहारा हॉटेल (कुर्ला) ते अनिस कंपाउंड साकीनाका पर्यंत भव्य रॅली आयोजित केली होती. या रॅलीत जवळपास दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लक्षवेधी मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, आपण फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे आणि भारतीय संविधानाचे पाईक आहोत. हा कायदा जातीय तंटे किंवा सामाजिक अराजकता माजविणाऱ्या समाज कंटकांची किंवा त्या प्रकारच्या मानसिकतेची पायमल्ली करणारा आहे. या बिलमध्ये तशा प्रकारचे कठोर प्रविधान करून ठेवले आहे. कर्नाटकात चाललेले हिजाब प्रकरण असो किंवा दलित मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समाजातील कमकुवत घटकांना यामुळे बळकटी येईल. या प्रसंगी मुस्लिम संघटनांचे मान्यवर मौलाना मोहम्मद अशरफ साहब, मौ. सय्यद मो. राशीद अशरफ साहब, मौ. मो. हाशिम अशरफी साहब, मौ. मो. कमर रजा अशरफी साहब, मौ. मो. सय्यद मंजूर अशरफी साहब, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, शिस्त पालन समिती आणि राज्य प्रशिक्षण समिती सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अबुल हसन खान, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.