मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि मागील लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात आघाडीच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बिहारमध्ये इंडिया आघाडीने दलित नेतृत्वाला जाणीवपूर्वक किनाऱ्यावर ठेवले आहे,” आणि यामुळे आगामी बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवले नसते, तर भाजपा आज केंद्रात सत्तेत नसती. असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा
ॲड. आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) गंभीर आरोप केले आहेत. देशात आरएसएसने मनुवाद, सनातनवाद वाढवला. आरएसएसची निष्ठा देशाशी नसून सनातनवादाशी आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच राज्यातील संभाव्य निवडणुकीबद्दल बोलताना, त्यांनी महाराष्ट्रात जर निवडणुका लागल्या तर बदल घडण्याची जास्त शक्यता आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.