अकोल्यात सगळीकडे झळकले प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स !
अकोला : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर देखील राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हटलं की, चर्चा होते अकोला लोकसभा मतदारसंघाची. याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘नया साल, नया खासदार’ अशा आशयाचे बॅनर लागले होते. आता पुन्हा अशाच प्रकारचे बॅनर्स अकोल्यात सगळीकडे लागले आहेत.
अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मतवाला, ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर, यही है राईट चॉईस, जिंदा बंदा, निडर – बेखौफ – बेबाक, अशा आशयाचे बॅनर्स प्रकाश आंबेडकर यांच्या छायाचित्रांसह अकोल्यात झळकत आहेत.
वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत दररोज पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेमध्ये आहे.
या संदर्भाने अकोला शहरातील जिल्हा परिषद प्रवेश द्वाराजवळ, राधाकृष्ण टॉकीज चौक, नेहरू पार्क, दुर्गा चौक, आदी ठिकाणी वेगवेगळ्या मजकुराचे बॅनर लागले आहेत. या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काही महिन्यांपूर्वी अकोल्यात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सबंध राज्यभर एवढ्या मोठ्या सभेची चर्चा रंगली होती.