कोटा (राजस्थान) : राजस्थानातील कोटा शहरातील न्यू मेडिकल रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर पाच महिलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तपासातून गंभीर धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत महिलांना देण्यात आलेले ऑक्सीटोसिन इंजेक्शन बनावट असल्याचे प्रयोगशाळा अहवालात स्पष्ट झाले असून, त्या इंजेक्शनमध्ये औषधी घटकांऐवजी केवळ पाणी भरलेले असल्याचे आढळून आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केले जात आहे. (Fake Oxytocin Injections)
ऑक्सीटोसिन हे प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे अत्यावश्यक औषध मानले जाते. मात्र संबंधित महिलांना देण्यात आलेल्या इंजेक्शनचा कोणताही वैद्यकीय परिणाम झाला नाही. परिणामी प्रसूतीनंतर सुरू झालेला रक्तस्त्राव थांबू शकला नाही आणि त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. अखेर पाचही महिलांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रुग्णालयात वापरण्यात आलेल्या इंजेक्शनच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार संबंधित बॅचमधील इंजेक्शन्स निर्धारित गुणवत्तेच्या निकषांवर अपयशी ठरली. त्यामध्ये आवश्यक औषधी घटकच नसल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळू शकले नाहीत. (Fake Oxytocin Injections)
या प्रकरणात सुरुवातीपासूनच बनावट ऑक्सीटोसिन इंजेक्शनचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. आता प्रयोगशाळा अहवाल समोर आल्यानंतर इंजेक्शनच्या गुणवत्तेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे राजस्थानातील आरोग्य व्यवस्थेतील औषध पुरवठा आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.