जॉर्जिया : नागपूरच्या युवा बुद्धीबळपटू दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या FIDE महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात तिने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला मात देत बुद्धीबळ विश्वात आपला ठसा उमटवला.
अंतिम सामन्याची सुरुवात अत्यंत अटीतटीची झाली. शनिवार आणि रविवारी खेळले गेलेले दोन्ही क्लासिकल सामने १-१ अशा बरोबरीत सुटले, ज्यामुळे विजेत्याचा निर्णय घेण्यासाठी रॅपिड राऊंडचा अवलंब करावा लागला. आज, सोमवारी झालेल्या रॅपिड राऊंडमध्ये दिव्याने आपले कौशल्य आणि मानसिक कणखरता सिद्ध केली.
जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या दिव्याने पहिल्या रॅपिड गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह आक्रमक सुरुवात करत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी बरोबरी साधली. त्यानंतर, दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि कोनेरू हम्पीला पराभवाची धूळ चारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
बुद्धीबळ तज्ञांनी दिव्याच्या या विजयाचे कौतुक केले आहे. स्टार बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदने सामन्यापूर्वीच दिव्याची मानसिक कणखरता आणि उत्कृष्ट तयारी लक्षात घेऊन तिच्या विजयाची शक्यता वर्तवली होती, जी खरी ठरली. विशेष म्हणजे, दिव्या आणि हम्पी या दोघींनीही अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चीनच्या खेळाडूंना पराभूत केले होते.
या विजयामुळे दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये (अमेरिकन $50,000) इतकी बक्षीस रक्कम मिळाली आहे, तर उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३० लाख रुपये (अमेरिकन $35,000) मिळाले आहेत. याशिवाय, दोघींनीही अत्यंत प्रतिष्ठित ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे, ज्यामुळे त्यांना आता अधिक प्रायोजक मिळण्याची अपेक्षा आहे. दिव्याच्या या विजयामुळे भारतीय बुद्धीबळाला एक नवीन चमक मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर...
Read moreDetails