अकोला : भारतीय बौद्ध महासभेच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, संघटनेने जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची व धम्म मेळाव्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वेळेत वाढ करण्याची मागणी केली आहे.
गेली ४२ वर्षांपासून हा महोत्सव अकोला येथे भव्य प्रमाणात साजरा होत असून, मिरवणूक आणि धम्म मेळाव्यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातून लाखो अनुयायी सहभागी होतात. प्रचंड गर्दीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेने जिल्हा प्रशासनाकडे संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची मागणी केली आहे.
वाहतुकीत बदल आणि वेळेत वाढ :
महोत्सवांतर्गत निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या मार्गावर सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत रहदारी पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. यात वडगाव मार्गावरील सर्व रावर चौक ते अग्रसेन चौक या दरम्यानचा रस्ता आणि उड्डाणपुलासह जड वाहनांची वाहतूक थांबवून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, हा धम्म मेळावा समाजाच्या प्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या मेळाव्याशी सामाजिक भावना जोडलेल्या असल्याने, मेळावा रात्री दोन तास वाढवून रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांनी केली आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अकोला येथे हा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होतो, ज्यात राज्यभरातून अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अनुयायांच्या सोयीसाठी या मागण्या प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..