अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील काही गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत पीडित तरुणाचे हात-पाय मोडले असून, त्याचा एक डोळा निकामी झाला आहे.
आरोपींनी क्रूरतेची हद्द ओलांडत पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला अज्ञातस्थळी फेकून दिले. या घृणास्पद घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवर ट्विट करत या घटनेची माहिती दिली. त्यांनी नमूद केले आहे की, संजय वैरागर या तरुणाला गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) १५ ते २० गुंडांनी गावातून उचलून नेले आणि अज्ञात स्थळी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायावरून आणि हातांवरून मोटारसायकल घालून त्याचे हात-पाय मोडले. गंभीर मारहाणीमुळे त्याचा एक डोळा निकामी झाला.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला फेकून दिले. पीडित तरुण संजय वैरागर याला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ॲड. आंबेडकर यांनी आज पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली. त्यांनी लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेणार असल्याचेही सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी –
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या सोबत असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास यावेळी देण्यात आला. यावेळी पीडित कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवर संवाद साधला.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, त्यांना ‘मकोका’ कायद्यांतर्गत शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
Dalit Youth from Matang Community Brutally Beaten in Ahmednagar Prakash Ambedkar Demands MCOCA Action Against Accused