वंचित बहुजन आघाडीची घोषणा!
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावर्षी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी महाराज मैदान, दादर (शिवाजी पार्क) येथे “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी व युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते.
यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी सांगितले की, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण भारतीय लोकशाहीचे दिशादर्शक भाषण होते. देशात संविधान लागू होण्याआधी बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली होती. त्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी देशासमोर तीन प्रमुख इशारे दिले होते –
१. लोकशाहीचा उपयोग व्यक्तीपूजेसाठी करू नका, कुणालाही देवासारखा मानू नका.
२. राजकीय लोकशाहीचे सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतर करणे आवश्यक आहे.
३. जातिभेद, अन्याय आणि जुनी सामाजिक रुढी टिकवल्यास स्वातंत्र्य पुन्हा हरवू शकतो, असा त्यांनी इशारा दिला होता.
आज देशात संविधानविरोधी वातावरण तयार होत आहे. राज्यकर्ते संविधानाची पायमल्ली करत असल्याने जनतेत असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी संविधान सम्मान महासभेद्वारे देशाला पुन्हा दाखवून देऊ की, हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालेल, मनुवादाने नाही.
Dr. Naresh Dadhich : प्रख्यात शास्त्रज्ञ व आयुका पुणेचे माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांचे निधन!
२५ नोव्हेंबर २०२३ रोजी शिवाजी मैदानावर झालेल्या संविधान सम्मान महासभेला सुमारे एक लाख फुले–शाहू – आंबेडकरवादी जनता उपस्थित होती. यावर्षीची सभा त्याहून मोठी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे या महासभेचे प्रमुख मार्गदर्शक असतील. तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण मान्यवर या सभेला उपस्थित राहणार असून, त्यांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाणार आहे.





