मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विविध कामगार संघटना यांच्यात २८ जुलै रोजी झालेल्या कराराचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सर्व कामगार संघटनांसोबत पुन्हा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात २८ जुलै रोजी झालेल्या करारातील परिशिष्ट क्र. ४ आणि परिशिष्ट क्र. ९ यावर तातडीने स्थगिती आणून त्यांचा फेरविचार करण्याची मागणी केली.
याचबरोबर, लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार घाणीशी संबंधित कामगारांना (जसे की देवनार कत्तलखाना, बाजार, मलेरिया, सार्वजनिक आरोग्य विभाग, ड्रेनेज, मॅन्युअर आणि सर्व स्वाती) वारसा हक्काने नोकरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर आयुक्तांनी हे प्रकरण लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, सदस्य अनंत पवार, अतिरिक्त सरचिटणीस बाबुराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.