अमरावती: ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’ या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येतो, मात्र अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत जे घडले, त्याने राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कट्टर वैचारिक विरोधक आणि एकमेकांचे ‘राजकीय शत्रू’ समजले जाणारे भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) सत्तेच्या सारीपाटावर चक्क एकाच जहाजात स्वार झाले आहेत. या युतीमुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप आणि टिकेची झोड उठली आहे.
आतापर्यंत निवडणुकांच्या सभांमध्ये एकमेकांवर आगपाखड करणारे, एकमेकांच्या विचारधारेला देशहितासाठी घातक ठरवणारे हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी इतक्या टोकाला जातील, अशी कल्पनाही सामान्य मतदाराने केली नव्हती. अचलपूर नगरपरिषदेत सभापती पदाच्या निवडीसाठी भाजपने एमआयएमची साथ घेतली, तर बदल्यात एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापती पद बहाल करण्यात आले.
अचलपूरमध्ये एमआयएमचे ३, अजित पवार गटाचे २ आणि ३ अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत भाजपला पाठिंबा दिला. या युतीचे पडसाद आता सोशल मीडिया आणि सर्वसामान्य जनतेत उमटू लागले आहेत. हिंदुत्वाचा अजेंडा कुठे गेला? असा सवाल भाजपच्या मतदारांकडून विचारला जात आहे.
‘भाजपसोबत कधीही जाणार नाही’ असे ठणकावून सांगणारे असदुद्दीन ओवेसी आता आपल्या नगरसेवकांच्या या निर्णयावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच केवळ खुर्ची मिळवण्यासाठी टोकाच्या विचारधारेच्या पक्षांशी हातमिळवणी करणे, हा मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
”ज्या पक्षांना आम्ही एकमेकांचे कट्टर शत्रू मानून मतदान केले, तेच आज सत्तेसाठी गळ्यात गळे घालून फिरत आहेत. हा लोकशाहीचा आणि मतदारांच्या विचारांचा अपमान आहे. याचे उत्तर एमआयएम पक्ष आणि इम्तियाज जलील यांनी द्यावे.”
– रशीद शेख, नागरिक, अचलपूर






