Kolhapur : ‘आई झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी, माझ्या बाळाला मी कायमचं गमावलं…’ हे शब्द बोरेबेट येथील कल्पना डुकरे (वय ३०) यांच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहत होते. मंगळवारी सकाळी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या कल्पना सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.
मात्र, रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गच बंद झाला. १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका खोकुर्ले गावाजवळ पाण्यात अडकून थांबली. त्याच ठिकाणी कल्पनाची प्रसूती झाली. आई वाचली, पण बाळाने जन्मानंतर काही क्षणातच प्राण सोडले.
आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभाराचा आणि निसर्गाच्या कोपाचा एक हृदयद्रावक अध्याय तिथेच लिहिला गेला.नंतर १०८ रुग्णवाहिकेने कल्पना यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले. पण त्यांच्या डोळ्यातील रिकामेपण आणि थरथरते हात पाहून उपस्थितांना गहिवरून आले. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर पावसाळ्यात गगनबावड्यातील नागरिकांसाठी जीवघेणी ठरणारी आरोग्य व्यवस्था किती कुचकामी आहे, याची ही वेदनादायी कहाणी आहे.