वाशीम : धानोरा खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता करणाऱ्या बौद्ध बांधवावर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली असता पोलिसांनी टाळाटाळ केली. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाअध्यक्ष सूर्यकांत गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलिसांत धाव घेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित आरोपींवर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले.
काय घडले नेमके ?
नितीन सुर्वे हे दररोजप्रमाणे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराची स्वच्छता करत होते. पुतळ्याच्या शेजारी नामदेव वाघ यांचे घर असून, त्याच्या अवारातील चीचोंडा झाडाचा पाला पाचोळा सतत पुतळ्यावर व परिसरात पडत होता. यामुळे परिसर अस्वच्छ होत असल्याने नितीन सुर्वे यांनी वारंवार संबंधितांना पालापाचोळा काढण्याबाबत सांगितले. मात्र, वाघ यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
६ सप्टेंबर रोजी सकाळी नितीन सुर्वे यांनी या विषयी तक्रार केली असता, आरोपीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी दीपक मनोहर मापारी, मनोहर आनंदा मापारी, शामराव रामभाऊ मापारी व रमेश आनंदा मापारी यांनी देखील शिवीगाळ केली तसेच “महाऱ्या, धेडया तुम्ही माजले, तुम्हाला सोलून काढायला पाहिजे” अशा अपमानास्पद शब्दांत धमक्या दिल्या. यावेळी गावाचे सरपंच अनिल प्रकाश मापारी आणि तंटामुक्ती समिती अध्यक्ष माधव तुळशीराम मापारी हेही उपस्थित होते.
पोलिसांचा अकार्यक्षम प्रतिसाद –
घटनेनंतर पीडित नितीन सुर्वे यांच्यासह गावातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र, दुपारी १२ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. यामुळे पीडित व समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
या परिस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड व जिल्हा पदाधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिस प्रशासनाशी कठोर शब्दांत चर्चा करून तत्काळ गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर अखेर आरोपींवर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.