सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी SIT स्थापन ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा युक्तिवाद ठरला निर्णायक
ऋषिकेश कांबळे
१४ ऑगस्ट २०२५, वेळ दुपारी दोनची… औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या केसची सुनावणी होती. आणि याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू मांडण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची कोर्टात इन्ट्री होते, आजूबाजूचे वकील आणि कार्यकर्ते ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या पाठोपाठ कोर्ट रूममध्ये जातात. कोर्टरूममध्ये आत आधीच बसलेले काही वकील आणि प्रकाश आंबेडकर यांना युक्तिवाद करतांना पाहण्यासाठी आलेले सामान्य लोकं यांनी कोर्ट रूम खचाखच भरून गेलेली होते. तिथे बसायला जागा नसल्याने काही वकील आणि लोकं मागच्या बाजूला उभे राहिले आणि काही जिथे जागा मिळेल तिथे उभे होते. तेव्हाच कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांची इन्ट्री होते, आणि सरकारी वकील या सुनावलीला ऑनलाईन जॉइन झाले. इथेच शेजारच्या इमारतीत असताना तुम्ही कोर्टरूम मध्ये न येता ऑनलाइन का जॉइन झालात? असा पहिलाच प्रश्न न्यायाधीशांनी सरकारी वकीलांना विचारला.
पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनावणीच्या दिवसापर्यंत काय काय कायदेशीर घडामोडी घडल्या ? याचा आढावा सरकारी वकिलाने न्यायाधीशासमोर मांडला. त्यात त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीनी दाखल केलेली फिर्याद वाचून दाखवली. त्यानंतर त्यावर तपास कोण करत आहेत, याची माहिती देताना औरंगाबाद CID चा उल्लेख सरकारी वकीलांनी केला. त्यावर न्यायाधीशांनी औरंगाबाद CID या प्रकरणात कशी काय ? असा सवाल केला. मी dysp यांना तपास करण्याचा आदेश दिला असताना, औरंगाबाद CID कडे तपास कसा काय दिला? असा प्रश्न विचारला. त्यावर सरकारी वकिलांनी IG यांनी आदेश दिल्याचे कोर्टासमोर सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी IG ने दिलेल्या आदेशाची प्रत सादर करायला सांगितले. त्यावर आदेशाची प्रत नसल्याने सरकारी पक्षाच्या वकिलांची भंबेरी उडाली. कोर्टाने त्यांना दोन वेळेस आदेशाची प्रत सादर करायला सांगितले. पण सरकारी वकील ती प्रत सादर करण्यास अशस्वी ठरले. या कारणाने कोर्टाने त्यांची खरडपट्टी काढली. त्यावर न्यायाधीशांनी cid च्या अधिकाऱ्यांना विचारले की, गुन्हा दाखल होऊन 8 ते 10 दिवस झाले आहेत, तर या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला.? यावर औरंगाबाद CID ने सांगितले की, आम्ही तपास कशा पद्धतीने करणार याचा आराखडा तयार केला आहे.
त्यावर न्यायाधिशांनी आराखडा काय असतो आणि तुम्ही कसा तपास करणार? हे आधीच कसे ठरवू शकता असे विचारले. त्यावर सरकारी पक्षाकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी तो आराखडा कोर्टासमोर सादर करण्यास सांगितले. तर त्यावर CID तपास अधिकाऱ्यांनी तो आराखडा IG कडे मान्यतेसाठी पाठवला असल्याचे उत्तर दिले. त्यावर न्यायाधीशांनी IG चा आणि या प्रकरणाचा संबंध काय ? ते का हस्तक्षेप करत आहेत ? असा सवाल केला. यावर सरकारी पक्षाकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्याचवेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने सुरुवाती बाजू मांडणारे अँड. प्रकाश आंबेडकर हे पोलिस आणि सरकारी वकिलांची न्यायालयासमोर चालू असलेली सारवासारव आणि लपवाछपवीचे निरीक्षण करत होते. या सर्व प्रक्रियेत काहीतरी गोंधळ आहे, गूढ लपलेले आहे म्हणून सर्व पोलिस अधिकारी हस्तक्षेप करत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी ओळखले आणि न्यायालयासमोर मुद्दे मांडण्यासाठी परवानगी मागितली.
त्यावर न्यायाधीश म्हणाले की, मिस्टर आंबेडकर 5 मिनिटे थांबा, आधी यांचा चाललेला खेळ नीट बघू द्या… त्यावर अॅड. आंबेडकर म्हणाले ठीक आहे. त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाच्या तपास अधिकाऱ्यांना investigation diary मागितली. तर ती डायरी सुद्धा ते न्यायालयासमोर पोलीस सादर करू शकले नाहीत, त्यावर न्यायाधीशांनी म्हटले की, तुम्ही युक्तिवाद करायला उभे राहिला आहात आणि तुमच्याकडे साधी तपास डायरी नाही?, तुम्ही काय न्यायालयाचा खेळ लावलाय का ? तुमचं नेमकं काय चाललंय ? असा सवाल केला. यामध्ये पोलिस आणि सरकारी पक्षाची धुलाई केली. त्यावर सरकारी वकिलांनी आणि त्यांच्या सहाय्यक वकिलांनी न्यायालयासमोर शरमेने मान खाली घातली. त्यानंतर न्यायाधीशांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्यांनतर प्रकाश आंबेडकर यांनी काहीही न बोलता एक कागद न्यायालयासमोर सादर केला आणि न्यायालयाने त्यांना विचारले असता हे काय आहे?.
यावर ॲड. आंबेडकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी कशी करावी? या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा निकाल संदर्भ म्हणून सांगितला. त्यात त्यांनी ज्यात परिच्छेद क्र. 6 पोलिस गुन्हेगार असल्यास त्यांना चौकशीपासून कसे लांब ठेवले जाते याचा उल्लेख होता आणि परिच्छेद क्र. 3 ज्यात चौकशी करण्यासाठी स्वतंत्र SIT स्थापन करण्याचा उल्लेख केला. त्यांनतर न्यायालयाने अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद मान्य केला आणि SIT स्थापना करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. आता ही SIT कशा पद्धतीने पुढील तपास करणार हे पाहण महत्वाचे ठरणार आहे. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये सुरुवातीपासून खंबीरपणे रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई लढत असलेले बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे SIT स्थापन झालेली आहे. आता तरी सोमनाथला न्याय मिळेल याचा मार्ग मोकळा झाला आहे.