लातूर : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील डॉ. एन. वाय. तासगावकर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या अरहंत मनोज लेंढाणे (वय २१, रा. लातूर) या बौद्ध विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ करून हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी अरहंतच्या तक्रारीवरून १२ विद्यार्थ्यांविरोधात शिवीगाळ, मारहाण आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न केल्याने वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. एन. वाय. तासगावकर कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत असलेला अरहंत मनोज लेंढाणे या बौद्ध विद्यार्थ्याला २ जून २०२५ रोजी कॉलेजमधील काही गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली. “तू महाड्या आहेस, कमी मार्क्स घेऊन आलास आणि आमच्यामध्ये बसलास. तुझी लायकी नाही आणि डॉक्टर बनायला आलास,” अशा अर्वाच्य भाषेत त्याला शिवीगाळ करण्यात आली.
हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यात आली, तसेच त्याच्या गुप्त अंगावरही लाथा मारण्यात आले. मारहाणीनंतर अरहंत तक्रार करेल या भीतीने आरोपी विद्यार्थ्यांनी त्याला एका खोलीत डांबून ठेवले. २२ जून २०२५ रोजी अरहंतने मारहाणीचे फोटो आपल्या आई-वडिलांना पाठवले.
त्यानंतर अरहंतची आई मेनेका लेंढाणे यांनी तात्काळ त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल, तरीही अटक नाही अरहंतच्या तक्रारीवरून विजय ढोणे, रोहन जावणे, तन्मय कापुरे, मिल्खा सिंग, मयूर पवार, संदेश काळे, आफताब मुजावर, तेजस गावित, वेदांत सानप, गौरव मडके, ओंकार लोहार यांच्यासह एकूण १२ विद्यार्थ्यांविरोधात शिवीगाळ, मारहाण आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी संबंधित पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप अरहंतच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी हे बड्या घरची मुले असल्याने पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी अरहंतची आई मेनेका लेंढाणे यांनी तासगावकर कॉलेजकडेही आरोपी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
परंतु, कॉलेज व्यवस्थापनाने अरहंत अनुसूचित जातीचा विद्यार्थी असल्याने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आरोपी विद्यार्थ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा आयटी प्रमुख राहुल सोनवणे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जातीवाचक शिवीगाळ करून अरहंत लेंढाणे या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...
Read moreDetails