ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्षांना पत्र !
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीची तारीख आता कधीही जाहीर होऊ शकते. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 10 मार्चला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेले पत्र एक्स हॅंडलवर टाकले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून ती काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडल्याचे आंबेडकरांनी पत्रात म्हटले आहे.
निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील सहमतीचा अभाव आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होत नसल्याने हे लक्षात घेऊन मी 9 मार्चला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी संपर्क साधला होता, असे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
आमचं फोनवर विस्तृत बोलणं झालं. चेन्निथलाजी यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) किमान 18 जागांवर ठाम असल्याच्या मुद्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचेही त्यांनी म्हटल्याचा उल्लेख पत्रात आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मांडला असल्याचे आंबेडकर म्हटले आहे. तसेच, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात याविषयी आपल्याला सांगतील असे आश्वासन फोनवर दिले. मात्र, आतापर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मला आशा आहे की, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लवकरच एकत्र बसतील जेणेकरून आम्ही भाजप-आरएसएसचा पराभव करण्यासाठी पुढे जाऊ शकू असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.