मुंबई : ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सम्यक समाज आंदोलनापासून भारिप ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवडी रुग्णालयात क्षयरोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक जुना आणि निष्ठावंत कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
अलोक कांबळे हे नायगाव येथील बीडीडी चाळीत वास्तव्यास होते. आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असलेले आंबेडकर भवन त्यांच्या घरापासून जवळ असल्याने पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये, मोर्चांमध्ये, सभा आणि परिषदांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत. आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र असलेल्या पाक्षिक प्रबुद्ध भारताशी त्यांचे अतूट नाते होते. प्रबुद्ध भारताचे ते प्रमुख विक्रेत्यांपैकी एक होते.
केवळ आंबेडकर भवन परिसरातच नव्हे, तर वाचकांच्या घरी जाऊन प्रबुद्ध भारताचा अंक पोहोचवण्याचे काम ते सातत्याने करत असत. पुढे नायगाव येथून पनवेल येथे स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांच्या या कार्यात खंड पडला नाही. पनवेलमध्येही त्यांनी मित्रपरिवार जोडला आणि घरोघरी जाऊन प्रबुद्ध भारताची विक्री सुरू ठेवली. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीशी संबंधित पुस्तके आणि साहित्याची विक्री करून चळवळीतील वैचारिक साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्यांनी केले.
Also Read : महापे MIDC मधील कामगारांना थकीत पगार मिळवून देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
अविवाहित असलेले अलोक कांबळे हे चळवळीतील लोकप्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना नावाने ओळखत होते. आंबेडकरी चळवळ, आंबेडकर भवन, प्रबुद्ध भारत आणि आंबेडकर परिवाराप्रती त्यांची अढळ निष्ठा होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, ज. वि. पवार, शांताराम पंदेरे आणि सुदास जाधव यांच्याशी त्यांचे विशेष स्नेहाचे संबंध होते.
अलोक कांबळे यांच्या निधनाची बातमी शिवडी रुग्णालयातील डॉक्टरांनी भीमराव आंबेडकर यांना दिली. ही बातमी ऐकून त्यांना गहिवरून आले. एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याची भावना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केली. आंदोलने, संघटनात्मक कार्य आणि प्रबुद्ध भारताच्या वितरणाच्या माध्यमातून आंबेडकरी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अलोक कांबळे यांनी सातत्याने योगदान दिले. त्यांच्या कार्याची आणि चळवळीप्रती असलेल्या निष्ठेची आठवण सहकाऱ्यांच्या मनात कायम राहील.
अशा या ज्येष्ठ कार्यकर्त्याला भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि प्रबुद्ध भारत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





