अकोला : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक सोहळा नसून, अन्यायकारी आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले महत्त्वपूर्ण सामाजिक व राजकीय विधान असल्याचे त्यांनी सांगितले.
१४ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः धम्मदीक्षा घेऊन लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. दीक्षाभूमीप्रमाणेच अकोल्यातही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हा दिवस साजरा केला जात असल्याचे अंजलीताई आंबेडकर यांनी नमूद केले.
बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह धम्मदीक्षा घेणे ही केवळ धार्मिक घटना नव्हती, तर माणुसकी आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेल्या समूहांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवणारी ऐतिहासिक घटना होती. अनेक वर्षे अन्याय सहन केल्यानंतर आता अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी विषमतावादी व्यवस्थेला आव्हान दिले. या निर्णयातून त्यांनी देशाला मोठा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक धक्का दिला, असे त्या म्हणाल्या.
आंबेडकरी जनतेच्या एकजुटीची व्यवस्थेला भीती –
फुले-शाहू-बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारी आंबेडकरी जनता अन्यायाविरुद्ध एकत्र उभी राहिली, तर काय होईल, याची धास्ती प्रत्येक व्यवस्थेला असते. त्यामुळे आंबेडकरी चळवळीची आंदोलने चिरडणे, समाजात फूट पाडणे आणि वेगवेगळी आमिषे दाखवून एकजूट कमकुवत करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. बाबासाहेबांनी अन्यायकारी व्यवस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि शिक्षण व विचार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेला आव्हान दिले होते, असे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी दाखवलेला मुक्तीचा मार्ग केवळ भाषणांमधून किंवा भीमस्तुतीतून समजून घेता येणार नाही. तो मार्ग समजून घेणे, स्वीकारणे आणि त्याचा डोळसपणे विचार करून त्यानुसार वाटचाल करणे आवश्यक आहे. मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे, आत्मसन्मान जागृत ठेवणे आणि सामूहिकरीत्या अन्यायकारी व्यवस्थेला आव्हान देणे, हाच त्या मुक्तिपंथाचा उद्देश आहे, असे अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या.
बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरील प्रज्ञा, शील, करुणा, विवेक आणि समता या तत्त्वांचा उल्लेख आपण भाषणांमध्ये सातत्याने करतो; मात्र या तत्त्वांचा प्रत्यक्ष जीवनात किती विचार करतो, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रज्ञावंत होणे म्हणजे केवळ शैक्षणिक पदव्या मिळवणे किंवा मोठी पदे मिळवणे नव्हे. तर परिस्थितीचा सारासार विचार करणे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत जागरूक राहणे आणि सामाजिक, आर्थिक तसेच कायदेशीर बदलांचा वंचितांच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेणे, हा प्रज्ञावंत होण्याचा खरा अर्थ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
औपचारिक शिक्षण हा आपला हक्क असून, त्याद्वारे जातीवर आधारित वर्णरचना आणि व्यवसायाची रचना मोडून काढण्यास मदत झाली आहे. मात्र, डोळसपणे जगण्यासाठी, समाजकारण आणि राजकारण करण्यासाठी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणेही आवश्यक आहे. वंचितांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सत्ताधारी आणि प्रस्थापित वर्ग आपले वर्चस्व टिकवण्यासाठी वंचितांना दडपण्याचे प्रयत्न करतो. वंचित समाजातील लोक अन्यायाविरुद्ध बंड करतील, या भीतीतून त्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. यामध्ये पोलीस यंत्रणेचा वापर, धार्मिक कट्टरता आणि जातीयतेचे विष पसरवण्याबरोबरच लोकांची विचार करण्याची शक्ती हिरावून घेण्याचाही प्रयत्न केला जातो, असे अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले.
शिक्षणातून विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि व्यवस्थेविषयी उत्तरे शोधण्याची क्षमता काढून घेतली, तर लोक प्रश्न विचारणे बंद करतात. भाजपचे सध्याचे राजकारण पुढच्या पिढीचा विचार करण्याचा मेंदू बंद करण्याच्या दिशेने जात असल्याची टीका करत, त्याविरुद्धचा संघर्ष हा मोठा सांस्कृतिक संघर्ष असल्याचे त्या म्हणाल्या.
वंचितांच्या एकजुटीतूनच अन्यायाविरुद्धचा लढा मजबूत होईल-
समता हा केवळ भाषणात वापरण्याचा शब्द नसून, तिचे आचरण रोजच्या जीवनात आणि अगदी घरापासून सुरू झाले पाहिजे. सर्व वंचितांबद्दल करुणा बाळगून त्यांना सोबत घेणे आणि धार्मिक, सामाजिक व राजकीय पातळीवर एकजूट कायम ठेवणे आवश्यक आहे. समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना बळी न पडता एकमुखाने उभे राहिल्यासच प्रस्थापित व्यवस्थेच्या अन्यायकारक धोरणांना तोंड देता येईल, असे आवाहन त्यांनी केले.
बाबासाहेबांचा सम्यक जीवनाचा मार्ग सर्व वंचितांपर्यंत पोहोचवून बहुसंख्य समाजाने तो स्वीकारण्याची गरज आहे. हा मार्ग सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचा आहे. तथागत गौतम बुद्धांनी दिलेली धम्मदीक्षा ही अन्याय सहन करण्यासाठी नव्हे, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी होती. त्यामुळे अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि समतेच्या मार्गावरील वाटचाल हाच आपला पुढील जीवनमार्ग असला पाहिजे, असे प्रतिपादन अंजलीताई आंबेडकर यांनी केले.





