पुणे : आगळंबे येथे सांचीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांचा वर्षावास समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख ऍड. डॉ. एस. के. भंडारे यांनी दिली.
दि. ३ सप्टेंबरला ऍड. डॉ. एस. के. भंडारे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आगळंबे येथील धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला भेट दिली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख विलास वंशिव यांनी मॉनेस्ट्रीच्या उभारणीसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती दिली. बौद्ध धम्मातील कार्यकर्ते, भन्ते आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सुमारे ४२ कोटी रुपयांचे बांधकाम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मॉनेस्ट्रीची पाहणी केल्यानंतर ऍड. डॉ. एस. के. भंडारे यांनी विलास वंशिव तसेच सर्व ट्रस्टींचे अभिनंदन केले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांचा वर्षावास समारोप कार्यक्रम घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान भारतीय बौद्ध महासभेचे राजरतन थोरात (पुणे महानगर अध्यक्ष व राज्य सचिव), विजय ओव्हाळ (राज्य संघटक), राधाकांत कांबळे (पिंपरी-चिंचवड अध्यक्ष), डी. व्ही. सुरवसे (पिंपरी-चिंचवड सरचिटणीस), तुळशीराम पडघन (शाखा कोषाध्यक्ष) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, धायरी येथील कमल बबन कांबळे यांनी त्यांचे जेतवन बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेला दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने ऍड. डॉ. भंडारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बुद्ध विहाराची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी ट्रस्टचे चेअरमन ऍड. सुभाष जोंजाळे यांच्यासोबत बैठक झाली. तसेच पुणे पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश व्होवाळ यांच्या नेरे येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे महानगर शाखेच्या बुक स्टॉलला भेट देऊन कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सौरभ हॉल येथे सेवानिवृत्त व्यक्ती व गृहिणींना उत्पन्नाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुढे म्हाडा प्रशिक्षण केंद्रात म्हाडा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.





