डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते मंत्रमुग्ध!
यवतमाळ : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचा संदेश आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक परिवर्तनाचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त उद्देशाने यवतमाळ शहरातील ४५ बौद्ध विहारे व धम्म चळवळीतील विविध मातृसंस्थांना प्रथमच एका विचारमंचावर आणून आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक वर्षावास सांगता समारंभ हजारो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यवतमाळच्या सामाजिक व धम्म चळवळीच्या इतिहासात हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. शहरातील विविध भागांत स्वतंत्रपणे धम्मकार्य करणाऱ्या बौद्ध विहारांना आणि विविध मातृसंस्थांना एकत्र आणण्याचा हा अभिनव प्रयोग मुख्य आयोजक डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून साकार झाला.
दरवर्षी वर्षावासाच्या कालावधीत प्रत्येक बुद्ध विहारात स्वतंत्रपणे ग्रंथवाचन, धम्मदेशना आणि विविध धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. मात्र, विहारांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून सर्वांनी सामूहिक सामाजिक शक्ती म्हणून एकत्र यावे, परस्परांतील संवाद वाढावा आणि बौद्ध समाजाची संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत व्हावी, या व्यापक संकल्पनेतून या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात पूजनीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभेच्या विविध शाखा, समण संघ, सद्धम्म प्रचार केंद्र, धम्ममल्ल विपश्यना केंद्र, त्रिरत्न बौद्ध महासंघ, समता सैनिक दल, ऑल इंडिया समता सैनिक दल, बौद्ध संस्कार संघ तसेच धम्म चळवळीतील विविध मातृसंस्था, सर्व बौद्ध विहारांचे पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या अडीच तासांच्या धम्मदेशनेने श्रोते मंत्रमुग्ध!
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण पूजनीय भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांची अभ्यासपूर्ण आणि प्रभावी धम्मदेशना ठरली. त्यांनी आपल्या रसाळ व मधुर वाणीतून तब्बल अडीच तास धम्मदेशना देत उपस्थित श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले.
बोधिसत्त्वाचा बुद्धत्वाकडे होणारा प्रवास, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतीत्यसमुत्पाद तसेच विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या त्रिपिटकांचे सखोल विवेचन त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने केले. धर्मांतराच्या ७० वर्षांनंतर बौद्ध समाजाची धम्मविषयक स्थिती, धम्माचरणाची आवश्यकता आणि सामाजिक जबाबदारी यावर त्यांनी चिंतनशील मार्गदर्शन केले.
भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञानच संपूर्ण जगाला शांती, स्थैर्य आणि मानवतेचा मार्ग दाखवू शकते, असे प्रतिपादन करत त्यांनी वर्तमान सामाजिक व राजकीय स्थित्यंतरांवरही भाष्य केले. आगामी काळात बौद्ध समाजाने संघटित राहून आपल्या सामाजिक सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
Also Read : दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा
४५ बौद्ध विहारांचे अध्यक्ष व सचिवांचा सन्मान
या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्य आयोजक डॉ. नीरज वाघमारे यांच्या हस्ते यवतमाळ शहरातील सर्व ४५ बौद्ध विहारांचे अध्यक्ष व सचिव यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. धम्माचा प्रचार-प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि आंबेडकरी विचारांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी विहारांच्या माध्यमातून अविरत कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून विविध बौद्ध मातृसंस्थांचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, भारतीय बौद्ध महासभा (चंद्रबोधी पाटील), मोहन भवरे भारतीय बौद्ध महासभा (भीमराव आंबेडकर), राजीव गुजर समण संघ, संजय ढोले धम्ममल्ल विपश्यना केंद्र, धम्मचारी आलोकदर्शी त्रिरत्न बौद्ध महासंघ, प्रकाश दातार समता सैनिक दल (चिमणकर), ज्ञानेश्वर अभ्यंकर समता सैनिक दल (भीमराव आंबेडकर), विजय लेले भारतीय बौद्ध महासभा (राजरत्न आंबेडकर), विश्वास बडवाईक बौद्ध संस्कार संघ, अविनाश बनसोड — सद्धम्म प्रचार केंद्र आणि रमेश कटके — अखिल भारतीय समण संघ यांचाही डॉ. नीरज वाघमारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
विहारे केवळ उपासनेची नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची केंद्रे बनावीत — डॉ. नीरज वाघमारे
आपल्या मनोगतात डॉ. नीरज वाघमारे यांनी बौद्ध समाजाच्या एकजुटीची आवश्यकता अधोरेखित केली. बुद्ध विहारे ही केवळ धार्मिक उपासनेची केंद्रे न राहता समाजप्रबोधन, शैक्षणिक जागृती, सांस्कृतिक जतन, सामाजिक परिवर्तन आणि वैचारिक क्रांतीची प्रेरणास्थाने बनली पाहिजेत, असे त्यांनी प्रतिपादन केले. विविध बौद्ध विहारे आणि मातृसंस्थांमध्ये परस्पर संवाद, समन्वय, सहकार्य आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“विहारे वेगवेगळी असली तरी आपला धम्म एक आहे, आपले बाबासाहेब एक आहेत, आपला विचार एक आहे आणि सामाजिक परिवर्तनाचे ध्येयही एकच आहे. वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र मनभेद विसरून समाजाच्या व्यापक हितासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तीपेक्षा समाज, संस्थेपेक्षा धम्म आणि मतभेदांपेक्षा बंधुभाव मोठा मानला, तरच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला प्रज्ञावान, शीलवान, संघटित आणि स्वाभिमानी समाज घडविता येईल,”असे भावनिक आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले. या सामूहिक आयोजनातून निर्माण झालेली एकजूट भविष्यात बौद्ध समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Also Read : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव
हजारो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीने सोहळ्याला भव्य स्वरूप –
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामदास वीर, नगरसेविका मीराताई वीर, संजय इंगळे, केशव भागवत, आनंद भगत, अरविंद दिवे, गजानन कोकाटे, विलास वाघमारे, शुभांगी लिहितकर, सविता तिडके, रमा नाईक, राखी नगराळे, प्रज्ञा उमरे, वनिता राऊत, धम्मा उमरे, शोभा मोहोड, सुनंदा मोहोड, संध्या काळे, विमल गवळी, करुणा चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या ऐतिहासिक धम्म सोहळ्याला हजारो बौद्ध बांधव, उपासक-उपासिका, विविध विहारांचे पदाधिकारी, मातृसंस्थांचे प्रतिनिधी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघपाल कांबळे यांनी केले. बौद्ध विहारांचे स्वतंत्र अस्तित्व जपत समाजहितासाठी एकत्र येण्याचा संदेश देणारा हा सामूहिक वर्षावास सांगता सोहळा यवतमाळच्या धम्म चळवळीतील एकजुटीचे नवे पर्व ठरला.





