– ॲड. गोविंद दळवी
२०१४ ते २०२५ : पक्षांतराचा दस्तऐवज आणि २०२९ : प्रकाश आंबेडकरांनी २०२४ मध्ये विचारलेल्या हमीच्या प्रश्नापासून कार्यकर्त्याच्या निष्ठेच्या अंतिम कसोटीपर्यंत
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे आता बातमी राहिलेली नाही; पक्ष बदलूनही राजकीय वैधता अबाधित ठेवणे हीच खरी बातमी झाली आहे. सत्ता बदलते, समीकरणे बदलतात, झेंडे बदलतात, चिन्हे बदलतात; पण या सगळ्या बदलांच्या गर्दीत एक चेहरा मात्र कायम उपेक्षित राहतो, तो म्हणजे पक्षासाठी आयुष्य झिजवणारा सामान्य कार्यकर्ता. आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक प्रश्न ठामपणे उभा आहे, अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले, तर काँग्रेसवाले त्यांचा प्रवेश नाकारतील का? हा प्रश्न केवळ अशोक चव्हाण यांच्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, नितेश राणे आणि २०१४ नंतर पक्षांच्या उंबरठ्यांची अदलाबदल करणाऱ्या प्रत्येक राजकीय चेहऱ्याला लागू होतो. त्याहूनही मोठा प्रश्न हा आहे की, पक्षनिष्ठेची किंमत नेमकी किती आणि संधीवादाची किंमत किती?
अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या राजकारणातील सर्वसामान्य नाव नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडच्या राजकारणातील दीर्घकाळ प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये दीर्घ राजकीय वाटचाल केली. मात्र १२ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि १३ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाच्या नव्या राजकारणाची भूमिका मांडली. काँग्रेसमध्ये असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारण केले, त्याच पक्षाच्या नेतृत्वावर भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी अनेकदा कठोर टीका केली. काँग्रेसचा अंतर्गत विसंवाद, विकासाचा संथ वेग, राहुल गांधींच्या राजकीय भूमिकांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यपद्धतीपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपच्या भूमिकेला समर्थन देत काँग्रेसवर आक्रमक प्रहार केले. मग प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या पक्षाला कालपर्यंत ते आपला राजकीय परिवार म्हणत होते, तो पक्ष जर आज त्यांना कालबाह्य वाटत असेल, तर उद्या पुन्हा त्याच घराच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर त्या घराने त्यांचे स्वागत करावे का? आणि जर स्वागत केले, तर काल त्यांच्यामुळे राजकीय संकटातही काँग्रेसचा झेंडा हातात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला कोणता संदेश जाईल?
पक्षांतराला तत्त्वतः विरोध करता येत नाही. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला राजकीय भूमिका बदलण्याचा अधिकार आहे. मतभेद असतील, विचारांमध्ये परिवर्तन झाले असेल, पक्षाच्या धोरणांशी असहमती असेल तर पक्ष सोडण्याचा अधिकार नाकारता येणार नाही. परंतु प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा विचार बदलण्यापेक्षा सत्तेची दिशा बदलते आणि त्यासोबत विचारसरणीही बदलते. २०१४ नंतर महाराष्ट्राने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतून भाजपकडे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पक्षांतरांचे राजकारण पाहिले. या काळात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची यादी लांबलचक आहे.
२०१४ ते २०२५ : काँग्रेस → भाजप पक्षांतराचा दस्तऐवज
महाराष्ट्रातील काँग्रेसचे आजी-माजी आमदार / विधानपरिषद सदस्य जे भाजपमध्ये गेले:
1. प्रशांत ठाकूर — पनवेल, रायगड — माजी आमदार
2. आशिष देशमुख — काटोल, नागपूर — माजी आमदार
3. रमेशसिंह ठाकूर — कांदिवली पूर्व, मुंबई — माजी आमदार
4. राजहंस सिंह — मुंबई — माजी आमदार / विधानपरिषद सदस्य
5. कालिदास कोळंबकर — वडाळा, मुंबई — माजी आमदार
6. कृपाशंकर सिंह — मुंबई — माजी आमदार / माजी राज्यमंत्री
7. काशीराम पावरा — शिरपूर, धुळे — माजी आमदार / आमदार
8. अमरीश पटेल — धुळे — माजी आमदार / विधानपरिषद सदस्य / माजी मंत्री
9. गोपालदास अग्रवाल — गोंदिया — माजी आमदार
10. जयकुमार गोरे — माण-खटाव, सातारा — आमदार / मंत्री
11. राधाकृष्ण विखे पाटील — शिर्डी — माजी आमदार / माजी विरोधी पक्षनेते / मंत्री
12. हर्षवर्धन पाटील — इंदापूर, पुणे — माजी आमदार / माजी मंत्री
13. संग्राम थोपटे — भोर, पुणे — माजी आमदार
14. संजय जगताप — पुरंदर, पुणे — माजी आमदार
15. शिरीषकुमार कोतवाल — चांदवड, नाशिक — माजी आमदार
16. कैलास गोरंट्याल — जालना — माजी आमदार
17. सुरेश वरपुडकर — पाथरी, परभणी — माजी आमदार / माजी राज्यमंत्री
18. दिलीप माने — दक्षिण सोलापूर — माजी आमदार
19. कुणाल पाटील — धुळे ग्रामीण — माजी आमदार
20. नामदेव उसेंडी — अहेरी, गडचिरोली — माजी आमदार
21. पद्माकर वळवी — अक्कलकुवा, नंदुरबार — माजी आमदार / माजी मंत्री
22. विजय खडसे — उमरखेड, यवतमाळ — माजी आमदार
23. प्रकाश पाटील देवसरकर — उमरखेड, यवतमाळ — माजी आमदार
24. ओमप्रकाश पोकर्णा — नांदेड दक्षिण — माजी आमदार
25. अविनाश घाटे — मुखेड — माजी आमदार
26. भास्कराव पाटील खतगावकर — देगलूर/नांदेड — माजी आमदार / माजी खासदार
27. माधव किन्हाळकर — भोकर — माजी आमदार / माजी मंत्री
28. अशोक चव्हाण — भोकर, नांदेड — माजी आमदार / माजी मुख्यमंत्री
29. अमरनाथ राजूरकर — नांदेड — माजी आमदार / माजी विधानपरिषद सदस्य
30. डी. पी. सावंत — नांदेड उत्तर — माजी आमदार / माजी मंत्री
31. जितेश अंतापूरकर — देगलूर — माजी आमदार
32. बसवराज पाटील — औसा, लातूर — माजी आमदार / माजी मंत्री
33. नारायण राणे — सिंधुदुर्ग — माजी आमदार / माजी मुख्यमंत्री
34. नितेश राणे — कणकवली, सिंधुदुर्ग — आमदार
35. प्रज्ञा सातव — हिंगोली — माजी विधानपरिषद सदस्य
46. मेघना बोर्डीकर साकोरे — जिंतूर, परभणी — आमदार / विद्यमान राज्यमंत्री
एकूण : 36
राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, नितेश राणे, हर्षवर्धन पाटील, अमरीश पटेल, नारायण राणे, अशोक चव्हाण यांसारख्या नेत्यांचे राजकीय प्रवास हे या बदलत्या समीकरणांचे ठळक उदाहरण आहेत. काहींनी सत्ता बदलली, काहींनी चिन्ह बदलले, काहींनी पक्ष बदलला आणि काहींनी बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार पुन्हा आपली भूमिका बदलली. या सगळ्या प्रक्रियेत एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला, ज्यांनी पक्ष सोडला ते आपल्या राजकीय भवितव्यासाठी स्वतंत्र निर्णय घेत होते, पण ज्यांनी पक्ष सोडला नाही त्या कार्यकर्त्याच्या निष्ठेचे मूल्यांकन कोण करणार?
जयकुमार गोरे यांचा प्रवास या प्रश्नाचे बोलके उदाहरण आहे. काँग्रेसच्या राजकारणातून पुढे भाजपमध्ये गेलेल्या गोरे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि पुढे भाजप सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. नितेश राणे यांनीही काँग्रेसच्या राजकारणातून सुरुवात करून भाजपमध्ये आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपद भूषवल्यानंतर भाजपचा मार्ग स्वीकारला आणि भाजप सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. हर्षवर्धन पाटील, अमरीश पटेल, नारायण राणे, बसवराज पाटील यांच्यासारखे माजी मंत्रीही या प्रवाहात सामील झाले. आज हे सर्व नेते ज्या राजकीय व्यवस्थेचा भाग आहेत, त्या व्यवस्थेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. त्यामुळे उद्या यापैकी एखाद्या नेत्याने पुन्हा काँग्रेसच्या दारात येण्याची इच्छा व्यक्त केली तर प्रश्न केवळ प्रवेशाचा राहणार नाही; प्रश्न असेल, कालची भूमिका आणि आजचे पुनरागमन यांच्यामधील नैतिक अंतर पक्ष कसे भरून काढणार?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या राजकीय विश्वासार्हतेवर थेट प्रश्न उपस्थित केला होता. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी भाजपसोबत जाणार नाहीत, याची हमी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी हा प्रश्न अनेकांना राजकीय अट किंवा अविश्वासाचे प्रदर्शन वाटले असेल; परंतु महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाने पक्षांतराची शक्यता किती वास्तववादी आहे हे पुन्हा पुन्हा दाखवून दिले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्या वेळी उपस्थित केलेला प्रश्न आज अधिक मोठा झाला आहे. लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो तेव्हा त्याला मतदाराचा वैयक्तिक विश्वास मिळतो की पक्षाच्या विचारसरणीचा, संघटनेचा आणि चिन्हाचा विश्वास मिळतो, हा मूलभूत प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
नांदेडचा संदर्भ घेतला तर हा विरोधाभास अधिक स्पष्ट दिसतो. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या राजकीय वर्तुळातील काही महत्त्वाचे सहकारीही भाजपमध्ये गेले. _अमरनाथ राजुरकर_ यांच्यासह _ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, भास्करराव पाटील खतगावकर, माधव किन्हाळकर, डी. पी. सावंत, जितेश अंतापूरकर_ यांसारखे चेहरे काँग्रेस सोडून भाजपच्या प्रवाहात गेले. त्यानंतर नांदेडच्या राजकारणातही अनेक जुनी राजकीय नाती, सहकार क्षेत्रातील संबंध आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगवेगळ्या स्वरूपात कायम राहिली. २०२४ मध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत केले. या निवडणुकीने एक महत्त्वाचा संदेश दिला, एखादा मोठा नेता पक्ष सोडतो म्हणून त्याचा संपूर्ण राजकीय प्रभाव आपोआप नव्या पक्षात स्थलांतरित होत नाही. मतदाराच्या मनात पक्ष, व्यक्ती आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे वेगवेगळे हिशेब असतात. म्हणूनच राजकीय नेतृत्वाच्या बदलत्या भूमिकांपेक्षा जमिनीवर उभ्या असलेल्या कार्यकर्त्याचे नाते अधिक टिकाऊ असते.
याच पार्श्वभूमीवर सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनातील वेदना समजून घ्यावी लागेल. पक्षाचा मोठा नेता पक्ष सोडतो तेव्हा त्याच्याकडे पर्याय असतात. कार्यकर्त्याकडे नसतात. नेत्याकडे सत्ता असते, संसाधने असतात, संपर्क असतात, नवी दारे उघडण्याची क्षमता असते. कार्यकर्त्याकडे असतो एक झेंडा, एक विचार आणि त्या विचारावरचा विश्वास. तो उन्हात उभा राहतो, पावसात सभा भरवतो, पोस्टर लावतो, सोशल मीडियावर लढतो, विरोधकांच्या शिव्या खातो, नोटिसा झेलतो आणि पराभवातही पक्षाचा झेंडा खाली पडू देत नाही. मग एखादा मोठा नेता सत्ता बदलली की पक्ष बदलतो आणि काही वर्षांनी पुन्हा राजकीय समीकरण बदलले की तो म्हणतो, “मी पुन्हा माझ्या जुन्या घरात येऊ इच्छितो.” तेव्हा कार्यकर्त्याने काय करायचे? त्याने टाळ्या वाजवायच्या, फुलांचा हार घालायचा की शांतपणे एवढेच विचारायचे, “साहेब, तुम्ही गेलात तेव्हा आम्ही इथेच होतो. आता परत आलात; पण आमच्या निष्ठेचे काय?”
काँग्रेस आज संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, संस्थांचे स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यांवर भाजपविरोधात संघर्ष करत असल्याचे सांगते. जर काँग्रेसला भाजपचे राजकारण लोकशाहीसाठी धोकादायक वाटत असेल, तर त्या व्यवस्थेला राजकीय बळ देऊन गेलेला नेता उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करताच पुन्हा लोकशाहीचा योद्धा कसा ठरेल? हा प्रश्न अशोक चव्हाण यांच्यापुरता नाही. हा प्रश्न राजकीय सातत्याचा आहे. जर काँग्रेसने उद्या म्हटले की राजकारणात कायमचे शत्रू नसतात, तर कार्यकर्ता विचारेल, मग कायमचा मित्र कोण? जर म्हटले की जिंकण्याची क्षमता असलेला प्रत्येक नेता महत्त्वाचा, तर कार्यकर्ता विचारेल, मग माझी निष्ठा कशासाठी? आणि जर म्हटले की कालचे विसरून पुढे जाऊया, तर मतदार विचारेल, मग आम्ही मतदान करताना इतिहास का लक्षात ठेवायचा?
याचा अर्थ असा नाही की पक्षांतर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायमचा राजकीय बहिष्कार घालावा. लोकशाहीत माणसाला आपली भूमिका बदलण्याचा अधिकार आहे. विचार बदलू शकतो, चूक लक्षात येऊ शकते, राजकीय आत्मपरीक्षण होऊ शकते. पण पुनरागमनाला किंमत नसणे आणि निष्ठेला किंमत नसणे या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. कोणत्याही पक्षाने पुनरागमनासाठी काही स्पष्ट निकष ठरवले पाहिजेत. पक्ष सोडण्याचे कारण सार्वजनिकपणे स्पष्ट करणे, पक्ष सोडल्यानंतर घेतलेल्या भूमिकेची राजकीय जबाबदारी स्वीकारणे, काही काळ पक्षाच्या संघटनेत काम करणे, स्थानिक कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे आणि तात्काळ उमेदवारी न देणे अशा निकषांचा विचार होऊ शकतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पक्षात पुनरागमन करणाऱ्याचे मूल्यमापन केवळ तो निवडणूक जिंकू शकतो की नाही या निकषावर होऊ नये. पक्ष हा केवळ निवडणूक जिंकण्याचे यंत्र नसतो. पक्ष म्हणजे विचार, संघटना, कार्यकर्ता आणि जनतेचा विश्वास यांची सामूहिक निर्मिती असते.
२०२९ ची निवडणूक अजून दूर आहे; परंतु आजपासूनच तिची राजकीय बीजे पेरली जात आहेत. आज महायुतीत असले काही चेहरे उद्या उमेदवारीच्या गणितात अडचणीत आले तर पुन्हा महाविकास आघाडीच्या दारात येतील का, हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्या वेळी प्रवेशाच्या घोषणा होतील, पत्रकार परिषदा होतील, नव्या राजकीय भूमिकांचे समर्थन केले जाईल आणि “लोकशाही वाचवण्यासाठी” किंवा “विचारांमध्ये परिवर्तन झाल्यामुळे” पुन्हा पक्षात येत असल्याचे सांगितले जाईल. परंतु मतदाराचा प्रश्न अधिक साधा असेल, काल लोकशाही कुठे होती? काल तुम्ही कोणत्या पक्षासोबत उभे होता? काल कोणाविरुद्ध बोलत होता? आज का बदललात? आणि उद्या पुन्हा परिस्थिती बदलली तर काय कराल? कारण चिन्ह बदलता येते; इतिहास बदलता येत नाही. पक्षाचा झेंडा बदलता येतो; पण मतदाराच्या स्मरणातून कालची भाषणे पुसता येत नाहीत.
आज काँग्रेससमोर एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. अशोक चव्हाण उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतील तर काँग्रेस त्यांचा प्रवेश नाकारेल का? उत्तर हो असेल तर आजच स्पष्ट सांगा. कारण त्या उत्तरातून कार्यकर्त्याला संदेश जाईल की निष्ठेला किंमत आहे. उत्तर नाही असेल तर त्यामागचे तत्त्वही स्पष्ट करा. कारण मग कार्यकर्त्याला विचारावे लागेल, मी पक्षासाठी आयुष्यभर उभा राहिलो आणि सत्ता बदलली म्हणून पक्ष बदलणाऱ्याला माझ्यापेक्षा मोठी जागा का? हा प्रश्न फक्त काँग्रेसचा नाही; हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे.
आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठी उपेक्षा कोणाची झाली असेल, तर ती कार्यकर्त्याच्या निष्ठेची झाली आहे. नेते पक्ष बदलतात, आघाड्या बदलतात, समीकरणे बदलतात; पण कार्यकर्ता त्याच गावात, त्याच मतदारसंघात आणि त्याच जनतेसमोर उभा असतो. काल ज्याच्यासाठी प्रचार केला त्याच्याविरुद्ध आज प्रचार करावा लागतो. काल ज्याला नेता मानले त्याच्याविरुद्ध आज घोषणा द्याव्या लागतात. आणि उद्या तोच नेता पुन्हा आपल्या पक्षात आला तर त्याचे स्वागतही करावे लागते. ही केवळ राजकीय विसंगती नाही; हा कार्यकर्त्याच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे.
अशोक चव्हाण उद्या काँग्रेसमध्ये परत येतील की नाही, हे आज कोणीही निश्चित सांगू शकत नाही. कदाचित ते कधीच परत येणार नाहीत. कदाचित राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. पण त्यांच्या नावाने उभा राहिलेला प्रश्न आजच जिवंत आहे. राजकीय पक्षांनी जिंकण्यासाठी नेते निवडायचे की विचारांसाठी नेतृत्व घडवायचे? जर प्रत्येक निवडणुकीत पक्षाला फक्त “जिंकणारा चेहरा” हवा असेल, तर निष्ठावान कार्यकर्त्याने विचारधारा का जपावी? जर तिकीट हेच अंतिम ध्येय असेल, तर पक्षनिष्ठा ही मूर्खपणाची गुंतवणूक ठरणार नाही का? आणि जर राजकीय वारा बदलताच झेंडा बदलणेच यशाचे लक्षण असेल, तर उद्याच्या पिढीला आपण राजकारणात नेमका कोणता आदर्श देणार आहोत?
महाराष्ट्राने पक्षांतराचे अनेक अध्याय पाहिले आहेत. _प्रशांत ठाकूर ते मेघना बोर्डीकर साकोरे_ पर्यंत 36 नेत्यांनी पक्ष बदलले, काहींनी विचार बदलले, काहींनी भूमिका बदलल्या, काहींनी मित्र बदलले आणि काहींनी शत्रू बदलले. पण एक गोष्ट बदलू नये, जनतेचा विश्वास. आणि तो विश्वास जपायचा असेल तर राजकीय पक्षांनी एक गोष्ट शिकली पाहिजे. सत्तेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला दरवाजा उघडणे म्हणजे संघटना मजबूत करणे नव्हे; कधी कधी ते संघटनेच्या आत्म्याला कमकुवत करणे असते.
म्हणूनच काँग्रेसने, महाविकास आघाडीने आणि प्रत्येक राजकीय पक्षाने आजच स्वतःला आरशात पाहिले पाहिजे. अशोक चव्हाण उद्या परत आले तर? राधाकृष्ण विखे पाटील परत आले तर? जयकुमार गोरे परत आले तर? हर्षवर्धन पाटील, अमरीश पटेल, नारायण राणे, नितेश राणे आणि वरील यादीतील इतर चेहरे परत आले तर? दरवाजा उघडण्यापूर्वी एकदा त्या दरवाज्याबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्याकडे पाहाल का? कारण तोच कार्यकर्ता पंधरा-वीस वर्षे तुमचा झेंडा घेऊन उभा आहे. तोच पराभवात तुमच्यासोबत होता. तोच सत्तेविना तुमच्यासोबत होता. तोच रस्त्यावर तुमच्यासोबत होता आणि तोच उद्या मतदाराच्या दारात जाणार आहे. त्याला काय सांगणार? “तू निष्ठावान होतास म्हणून तू थांब; आणि ते संधीसाधू होते म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करतो?”
राजकारणात पुनरागमनाला जागा असू शकते; पण पश्चात्तापाशिवाय पुनरागमनाला, जबाबदारीशिवाय पुनर्वसनाला आणि कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुडवून मिळणाऱ्या उमेदवारीला लोकशाहीची प्रतिष्ठा म्हणता येणार नाही. २०२९ मध्ये कोण जिंकेल, कोण हरेल, कोणत्या पक्षाची सत्ता येईल, हे काळ ठरवेल. पण त्या निवडणुकीत महाराष्ट्राचा मतदार कदाचित एक वेगळाच हिशेब मांडेल, तुम्ही काल कुठे होता? आज कुठे आहात? आणि उद्या सत्ता बदलली तर कुठे जाणार?
कारण सत्ता बदलते, पक्ष बदलतात, झेंडे बदलतात, चिन्हे बदलतात; पण मतदाराची स्मृती बदलत नाही. आणि एकदा तुटलेला विश्वास हा उमेदवारीच्या अर्जाने, पक्षप्रवेशाच्या हाराने किंवा व्यासपीठावरील भाषणाने पुन्हा पूर्णपणे जोडला जात नाही. शेवटी इतिहासाला उत्तर द्यावे लागते. कार्यकर्त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहावे लागते. आणि मतदाराच्या विवेकापुढे नतमस्तक व्हावे लागते.
म्हणूनच आजचा प्रश्न अशोक चव्हाण यांच्यापुरता नाही. आजचा प्रश्न आहे, राजकारणात निष्ठा मोठी की सत्ता? विचार मोठा की उमेदवारी? कार्यकर्ता मोठा की आयात केलेला विजयी चेहरा? आणि काँग्रेसने जर या प्रश्नाचे उत्तर आज दिले नाही, तर उद्या २०२९ च्या रणांगणात तिच्या नेत्यांपेक्षा तिचेच कार्यकर्ते हा प्रश्न अधिक मोठ्याने विचारतील,
“तुम्ही नेत्यांना पुन्हा घरात घेतले… पण आमच्या निष्ठेचे काय केले?”
2014–2025 Party Switching to 2029: Prakash Ambedkar’s 2024 Guarantee Question and the Ultimate Test of Political Loyalty






