मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील अपुऱ्या व बंद सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी – वरळी विधानसभा यांच्या वतीने जी दक्षिण मनपा विभागाच्या कार्यालयावर तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता जी दक्षिण विभाग मनपा कार्यालय, नामजोशी मार्ग येथे काढण्यात येणार आहे.
वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमी ही मुंबईतील जुनी आणि ऐतिहासिक स्मशानभूमी असून, पूर्वी येथे एकाच वेळी १० ते १२ मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नव्हता. मात्र, स्मशानभूमीचे विकासकाम करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पारेख ट्रस्ट आणि जी दक्षिण विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या अनेक यंत्रणा बंद किंवा अपुऱ्या असून धुराचे प्रदूषण, योग्य वायुवीजनाचा अभाव, ऑक्सिजन व हवा खेळती राहण्याच्या व्यवस्थेतील त्रुटी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रकाशव्यवस्था अपुरी असून अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
याशिवाय गार्डनच्या नावाखाली दफनभूमीतील उपलब्ध जागा कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कामगार आणि सुरक्षा रक्षकांची पुरेशी व्यवस्था नसल्याने तसेच परिसरात गर्दुल्ले, अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांचा वावर वाढल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सन्मानजनक, सुरक्षित आणि आरोग्यदायी अंत्यसंस्काराची सुविधा मिळत नसेल, तर या संपूर्ण विकासकामाची चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सन्मानजनक व्यवस्था करा” या प्रमुख मागणीसह जी दक्षिण मनपा विभागाच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात हा तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाने स्मशानभूमीतील सर्व समस्या तातडीने सोडवून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.






