अहिल्यानगर: NEET परीक्षा प्रणालीतील महाघोटाळा आणि NTA च्या बेजबाबदार कारभारामुळे देशभरात तब्बल २२ निष्पाप विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, तरीही या देशातील आणि राज्यातील राजकारण्यांना पाझर फुटलेला नाही. हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक मुद्द्यांवर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरणारे नेते विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बळी जात असताना तोंडावर बोट ठेवून बसले आहेत, ही या देशाची मोठी शोकांतिका आहे.
या राजकीय अनास्थेविरोधात काल अहिल्यानगरात ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य ‘संघर्ष मार्च’ काढून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. माळीवाडा वेस येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या संघर्षाची धगधगती सुरुवात झाली. कापड बाजार मार्गे निघालेला हा शिस्तबद्ध मार्च दिल्ली गेट येथे पोहचल्यानंतर तेथे भव्य ठिय्या आंदोलनात रूपांतरित झाला. हातात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे फलक, NTA च्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करणारे बॅनर्स आणि लडाखचे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनाचे पोस्टर्स घेऊन शेकडो विद्यार्थी आणि नागरिक केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले होते.
Also Read : आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित
या आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी राजकीय व्यवस्थेवर कडक ताशेरे ओढले. ते म्हणाले की, धार्मिक वादांवर द्वेषाची पोळी भाजण्यासाठी हजारोच्या संख्येने एकत्र येणाऱ्या नेत्यांना विद्यार्थ्यांच्या रक्ताचा वास येत नाही का? २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनेही या निगरगट्ट व्यवस्थेला फरक पडत नाही. या राजकीय अनास्थेचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. समाजाने आणि राजकीय पक्षांनी आता तरी जागे व्हावे; धार्मिक वादांऐवजी शिक्षण, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याची वेळ आली आहे.
यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारसमोर अत्यंत आक्रमक मागण्या मांडल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कडून परीक्षांचे अधिकार काढून घेऊन अत्यंत पारदर्शक व स्वतंत्र सक्षम यंत्रणा उभी करावी, आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्ट कारभारामुळे बळी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची तात्काळ आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशा रोखठोक मागण्या या वेळी करण्यात आल्या.
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
या पेटून उठलेल्या संघर्षात सम्यक विद्यार्थी आंदोलनासह दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा, राष्ट्रीय सेवा दल, संभाजी ब्रिगेड, कामगार संघटना आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी ॲड. श्याम आसावा, जीवन कांबळे, सुशील साळवे, अविनाश धनवे, बापू चंदनशिवे, बहिरनाथ वाकळे, संध्याताई मेढे, अविनाश साठे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजित कुऱ्हाडे, संकेत शिंदे, रियाज शेख आणि विवेक कसबे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हातात डफली आणि माईक घेऊन सरकारचे वाभाडे काढले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या केंद्र सरकारविरोधात हा संविधानिक लढा यापुढे अधिक तीव्र केला जाईल, असा स्पष्ट इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.






