Entertainment News : मल्याळम टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे वयाच्या ४१व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते.
त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडी येथील सिद्धार्थ वेणुगोपाल यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. कस्तूरीमान आणि भाग्यजातकम् यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाली होती. अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती आणि महाविद्यालयीन काळात त्यांनी नाट्यनिर्मितीत सक्रिय सहभाग घेत आपल्या कारकिर्दीची पायाभरणी केली. (Malayalam TV Actor Siddharth Venugopal Passes Away)
सिद्धार्थ यांनी केवळ अभिनयच नव्हे, तर निवेदक (Presenter) म्हणूनही काम केले होते. निर्माता अरुण घोष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मालिकांच्या विश्वात पाऊल टाकले आणि अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सिद्धार्थ त्यांच्या पश्चात आई आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे सिद्धार्थ यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.





