बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर १३ फेब्रुवारी रोजी गावातील काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिला आणि बालकांना बेदम मारहाण करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी गरिबांची घरे आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे उध्वस्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ घरेच पाडली नाहीत, तर शेतातील सहा बोअरवेल दगडांनी भरून बुजवून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे, शासनाकडून मिळालेली घरकुलेही जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या मारहाणीत एक तरुण मुलगी गंभीर जखमी झाली असून, ती सध्या बीड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित कुटुंबातील मुलांना शाळेत येण्यासही मज्जाव केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, गुरुवार (दि. १९) वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी सुर्डी येथे घटनास्थळाला भेट दिली. पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. यावेळी चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि गट विकास अधिकारी (BDO) यांची भेट घेऊन चर्चा केली व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
शिवजयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन
शिवजयंतीचे औचित्य साधून घटनास्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “रयतेच्या राजाच्या राज्यात रयतेवरच अन्याय होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विष्णू जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे.






